सावंतवाडी  : उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाशी गद्दारी करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्ता उपभोगत आहेत. बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता आताच्या शिवसेनेत नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी येथे बोलताना केली.

या वेळी राणे यांनी विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल.

देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपची सत्ता कायम राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार फंडातून दिलेल्या एक कोटी रुपये खर्चाच्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या वेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

या वेळी देवबाग ग्रामस्थांच्या वतीने ना. नारायण राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देवबागचे मनोज खोबरेकर यांनीही बंधाऱ्याच्या कामास निधी दिल्याबद्दल ना. नारायण राणे यांचे विशेष स्वागत केले. या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मी १९९० मध्ये आमदार बनल्यानंतर देवबागचा बंधारा आणि रस्ता करून देत देवबाग गावाला सागरी अतिक्रमण व स्थलांतरापासून वाचवले. येथील बंधाऱ्याला आणि रस्त्याला इतिहास आहे. येथील ग्रामस्थांचे रक्षण व्हावे या माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी हे काम केले.