Narayan Rane Threat To MVA in Malvan : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी वाऱ्याच्या वेगाने कोसळला. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड वेदना झाल्या. तर, राजकीय नेत्यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला. विरोधकांनी या प्रकरणावरून गदारोळ सुरू केला असून आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर आज दौरा केला. याचकाळात खासदार नारायण राणेही तिथे पोहोचल्याने दोन्ही समर्थकांत राडा झाला. आदित्य ठाकरे किल्ल्यावर असल्याने नारायण राणे यांना पोलिसांनी अडवून ठेवलं. परिणामी राणे समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तसंच, नारायण राणे यांनीही संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने आदित्य ठाकरे यांनी आज मालवण येथे दौरा आयोजित केला होता. या पुतळ्याभोवती काय भ्रष्टाचार झालाय हे पाहण्यासाठी ते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. तर, रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनीही आज किल्ल्यावर पाहणी दौरा आयोजित केला. योगायोगाने हे दोन्ही नेते एकाचवेळी किल्ल्यावर पोहोचल्याने गोंधळ उडाला. आदित्य ठाकरे आधी पोहोचल्याने नारायण राणे यांना अडवून ठेवण्यात आलं. त्यामुळे समर्थकांनी पोलिसांविरोधात निदर्शने केली. तसंच, आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. आम्हाला आत जाऊद्या अशी मागणी केली असतानाही पोलिसांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही.. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरेही आम्ही मुख्य रस्त्यानेच बाहेर जाणार असल्याच्या मागणीवर अडून बसले. पुढच्या १५ मिनिटांत मुख्य मार्ग मोकळा केला तर आम्ही जाऊ, असं आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी म्हटलं. मात्र, मुख्य रस्ता सोडून जाण्यास नारायण राणे यांनी नकार दिला. परिणामी राजकोट किल्ल्यावर प्रचंड राडा झाला.

हेही वाचा >> Maharashtra News Live : “यापुढे पोलिसांशी असहकार्य असेल”; नारायण राणेंची पोलिसांशी हुज्जत!

एकेकाला घरात घुसून मारेन

यावेळी नारायण राणे यांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. ते पोलिसांना म्हणाले की, “पोलिसांना त्यांना (महाविकास आघाडीला) सहकार्य करायचं असेल तर करा. पण यापुढे आमच्या जिल्ह्यात तुम्हाला असहकार्य असेल. तुम्ही त्यांना येऊद्यात. तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो. घरात घुसून एक-एकाला रात्रभर मारून टाकीन. सोडणार नाही”, अशी उघड धमकीच नारायण राणेंनी दिली.

मालवणमध्ये आज कडकडीत बंद

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येत असून मालवण बंदची देखील हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये मालवण मधील अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी सहभाग दर्शवत दुकाने बंद ठेवली आहेत. निषेध मोर्चात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.