राणे अटक आणि सुटका प्रकरण : संजय राऊतांची अवघ्या एका शब्दात प्रतिक्रिया

मंगळवारी राज्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत हे मात्र कुठेच प्रतिक्रिया देताना अथवा व्यक्त झाले नाही, मात्र आज त्यांनी एक पोस्ट केलीय

Raut Tweet
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं ट्विट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र काल दिवसभर या प्रकरणावरुन शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आलं. असं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र कुठेच प्रतिक्रिया देताना किंवा यावर व्यक्त झाले नाही. आज म्हणजेच बुधवारी न्यायालयाच्या जामीनासंदर्भातील निकालाचे आदेश समोर आल्यानंतरही राऊत यांनी कोणतीच थेट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ट्विटरवरुन त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो सध्या चर्चेत आहे.

नक्की वाचा >> “राणेंची अटक योग्य पण…”; जामीन मंजूर करताना न्यायालयाने नक्की काय म्हटलं, राणेंना काय सांगितलं?

संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधण्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ दररोज शेरोशायरीमधून सूचक इशारे देणारे ट्विट केल्याचा संदर्भ असतानाच महाराष्ट्रासहीत देशभरामध्ये चर्चा झालेल्या राणेंच्या अटकेवरही त्यांनी एका फोटोच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलीय. राऊत यांनी केवळ ‘आज’ या एका शब्दासहीत एक फोटो ट्विट केलाय. या फोटोमध्ये वाघाच्या तोंडामध्ये कोंबडीच्या पिल्लाला दाखवण्यात आलं आहे. फोटोवर ‘आजचा दिवस थोडक्यात’ असं लिहिलेलं आहे. या फोटोमधून राऊत यांनी राणेंवर निशाणा साधलाय. राजकारणामध्ये येण्यापूर्वी राणेंचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच काल शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयांमध्ये कोंबड्या सोडण्यात आल्या तसेच कोंबडी असा उल्लेख असणारी बॅनरबाजीही करण्यात आली. त्याचसंदर्भाने राऊत यांनी कोंबडीचं पिल्लू वाघाने तोंडात पकडल्याचा फोटो ट्विट केलाय. शिवसेनेची निवडणुकीच निशाणी धनुष्यबाण असली तरी डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची ओळख मानली जाते. त्याचाच संबंध देत हा फोटो ट्विट करण्यात आला.

‘सामना’च्या अग्रलेखामधूनही आज राणेंवर टीका करण्यात आली आहे. टीका करताना राणेंचा उल्लेख ‘भोकं पडलेला फुगा’ असा करण्यात आलाय. “नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,” असा टोला या लेखाच्या सुरुवातीलाच लगावण्यात आलाय.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

अटक आणि सुटका घटनाक्रम कसा?

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची कोकण विभागीय जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिपळूणहून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचली. तेथील गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये कार्यक्रम आटोपून अल्पोपहार सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आपल्या ताफ्यासह तिथे दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अटक होऊ  नये, अशी मागणी करणारा राणे यांचा अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जनआशीर्वाद यात्रेत स्वत: राणेंसह त्यांचे चिरंजीव नितेश, नीलेश, आमदार प्रसाद लाड, यात्रेचे कोकण विभागीयप्रमुख प्रमोद जठार इत्यादींनी कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करत तिथेच ठिय्या मांडला. अटक वॉरंट दाखवले नाही तर तिथून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अखेर पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राणे यांची समजूत काढून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

नक्की वाचा >> राणेंच्या अटक आणि सुटका नाट्यावर नितेश राणेंची फिल्मी प्रतिक्रिया; रात्री ट्विट केला ‘हा’ व्हिडीओ

राणे यांना रात्री साडेआठच्या सुमारास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग दंडाधिकारी बाबासाहेब शेखपाटील यांच्यापुढे  हजर करण्यात आले. यावेळी राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, राणे यांना अटक करण्यापूर्वी नोटीस दिली नाही, अटक चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांची जामिनावर सुटका केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narayan rane vs shivsena sanjay raut tweeted a photo saying todays condition scsg