केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवरून गंभीर इशारा दिला आहे. “आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाहीत, अन् तुम्ही उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जाल,” असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. ते गुरुवारी (२२ सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल”

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल. गिधाड वगैरे कुणाला उद्देशून बोलले आहात? ही वक्तव्य तुरुंगाचा रस्ता दाखवणारी आहेत.”

“आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही”

“खोक्यांचा विषय तर आहेच. त्याची चौकशी होणार आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची सुटका झालेली नाही. सुशांत प्रकरणातूनही तुमच्या मुलाची (आदित्य ठाकरे) सुटका झालेली नाही. आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही,” असा इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.

“उद्धव ठाकरे शेवटपर्यंत अमित शाहांना फोन करत होते”

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना खोटारडं म्हटलं. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे खरं बोलत नाहीत, ते अत्यंत खोटारडे आहेत. युती असताना काल-परवापर्यंत उद्धव ठाकरे अमित शाहांना फोन करत होते. मला भाजपात घेऊ नये, मंत्रिपद देऊ नये यासाठी ते शेवटपर्यंत अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत. ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले हा महाराष्ट्रासाठी काळिमा आहे. त्यांनी काहीही केलं नाही.”

हेही वाचा : “…तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते”, गटमेळाव्यातील टीकेवरून नारायण राणेंचा हल्लाबोल

“किती मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत?”

“आज मराठी माणसावर बोलतात, त्यांनी किती मराठी मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत? किती मराठी माणसांना घरं दिली आहेत? याचं उत्तर त्यांनी द्यावं. उलट मराठी माणूस हद्दपार झाला. मराठी माणसाला वसई, पनवेल अशा दूरवरच्या भागात निघून गेला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका मातोश्री बंगल्याचे दोन बंगले केले. १९६६ मध्ये मराठी माणसाची मुंबईतील टक्केवारी किती होती आणि मुख्यमंत्री असताना २०२० मध्ये किती होती?” असा सवालही नारायण राणेंनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane warn uddhav thackeray aaditya thackeray about jail pbs
First published on: 22-09-2022 at 19:09 IST