अहिल्यानगर : समाज माध्यमातून खरेदी केलेले व नशेसाठी वापरले जाणारे ‘मेफेनटर्माईन सल्फेट’ इंजेक्शनच्या ४० बाटल्या शहरातील कोतवाली पोलिसांनी, मध्यवर्ती भागात असलेल्या गांधी मैदान परिसरातून आज, गुरुवारी जप्त केल्या. या संदर्भात तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली. अटक केलेल्या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज गुरुवारी दिला.

प्रताप अशोक अकोलकर (वय २१, रा. करंजी, पाथर्डी, अहिल्यानगर ), तेजस गंगाधर वारुळे (वय २१, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) व तेजस अमित उळागड्डे (वय २२, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अटक केलेले हे तिघेही व्यायामशाळेत (जिम) जाणारे आहेत. त्यामुळे व्यायामपटूंकडून या नशेच्या इंजेक्शनचा वापर केला जात असावा, असा संशय कोतवालीचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.

पोलीस निरीक्षक देशमुख यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नियुक्त होते. तेथे त्यांनी अशाच नशेच्या इंजेक्शनचा वापर उघडकीस आणून ६ गुन्हे दाखल केले होते. मात्र श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनचा वापर नशेसाठी केला जात असल्याचे आढळले होते तर नगर शहरात त्याचा वापर व्यायामपटूंकडून सुरू असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात आढळले आहे.

अटक केलेल्या तिघांनी समाज माध्यमावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे या इंजेक्शनची खरेदी केली. हे इंजेक्शन डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास मनाई आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी मैदान परिसरात चार शाळा आहेत. याच ठिकाणी तिघे इंजेक्शनच्या विक्रीसाठी आले होते. ऑनलाईनच्या माध्यमातून या तिघांनी ३०० रुपये प्रति इंजेक्शन खरेदी केले तर त्याची विक्री ६०० रुपयांना केली जाणार होती, असेही प्राथमिक पोलीस तपासात आढळले आहे.

या तिघा आरोपींकडून एक मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली आहे. जप्त केलेल्या नशेच्या ४० बाटल्यांची किंमत पंधरा हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख अधिक तपास करत आहेत.

कोतवाली पोलिसांनी ही कारवाई करतानाच केडगाव उपनगरातील वैष्णवनगर भागातील तिरंगा चौकात परिसरात एका घराच्या आवारात गांजाची झाडे लावून, गांजाची विक्री केल्याच्या आरोपावरून विकास बाळू उमाप (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचा १८ किलो २५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत. पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौड, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, शिरीष तरटे, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.