Naresh Mhaske Allegations Sanjay Raut: “ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देऊ नका म्हणून संजय राऊतांनी पवईमधील हॉटेलवर आमदारांची बैठक घेतली होती, असा गौप्यस्फोट शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केला आहे. खासदारकीसाठी नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्यामुळे राऊतांनी उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी शिव्या दिल्याचा आरोपही म्हस्केंनी केला. राऊतांनी मुख्यमंत्री व्हायचं होतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा झाली झाली होती. पण, उद्धव ठाकरेंचे नाव पुढे करण्यामागे राऊतांचा कट होता, असाही आरोप म्हस्केंनी माध्यमांशी बोलताना केला.
उद्धव ठाकरेंना विरोध करण्यासाठी आमदारांची राऊतांनी बैठक घेतल्याचा दावा
राज्यसभेसाठी नाव लवकर जाहीर केले जात नव्हते त्यावेळी राऊत उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरेंना देखील शिव्या देत होते, असा आरोप नरेश म्हस्केंनी केला. “राज्यसभेसाठी तिकीट जाहीर केले जात नव्हते, उशीर होत होता तेव्हा राऊत उद्धव ठाकरे सोडाच रश्मी ठाकरेंना देखील किती शिव्या देत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे. उद्धव ठाकरें मुख्यमंत्री झाले आणि स्वत:च्या भावाला मंत्री केलं नाही. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये बैठक घ्यायला लावली. उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री म्हणून घ्या यासाठी कोण कुभांड रचत होतं? हे अख्या शिवसेनाला माहिती आहे”, असे म्हस्के म्हणाले.
फुटीवेळी काय घडलं?
एकनाथ शिंंदेंच्याबरोबर जाणारा पहिला शिवसैनिक ते असल्याचे म्हस्के म्हणाले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावाही म्हस्केंनी केला. फोनवर मी एकनाथ शिंदेंच्या बरोबर असल्याचे सांगितले होते असेही म्हस्के पुढे म्हणाले. एकनाथ शिंदेंवर अन्याय होतोय आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका देखील मांडल्याचा खुलासा त्यांनी केला. एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली तर नरेश म्हस्के देखील त्यांच्याबरोबर जातील त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची तिकीट द्यायचं नाही हे राऊतांनी अयोध्येत एकनाथ शिंदेंच्या समक्ष सांगितल्याचा दावा म्हस्केंनी केला. कितीही टीका केली तर मी शिंदेंबरोबर राहणार असल्याचेही म्हस्केंनी स्पष्ट केले.
म्हस्केंची राऊतांवर टीका
“खूप पत्रं आहेत असं तुम्ही म्हणता, एक जरी पत्र असेल तर तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर मी देतो. वरिष्ठ नेते म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. आमची बंद मूठ बंद राहुद्या”, असा इशारा नरेश म्हस्केंनी दिला. “शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर राऊत रोज फोन करत होते, असेही म्हस्के यावेळी म्हणाले. संजय राऊत फेकूचंद आहेत, भोंगा या शब्दाची निर्मिती मी केली आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा राग समजू शकतो”, अशी टीका म्हस्केंनी केली. राऊतांना पक्ष काँग्रेसबरोबर घेऊन जायचा आहे, या पक्षाचे वाटोळे केले, अशी टीका म्हस्केंनी केली.
