scorecardresearch

“शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्यानं टीकास्र सोडलं आहे.

“शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
संग्रहित फोटो

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. यासाठी ४० रेडे, खोके सरकार, खंजीर, गद्दार आणि अंधश्रद्धेत गुरफटलेलं सरकार अशी विशेषणं वापरली जात आहेत. ठाकरे गटाच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे.

शरद पवार यांनी लिहून दिलेल्या स्क्रीप्टनुसार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत टीका करतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. यावेळी नरेश म्हस्के म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. या सरकारच्या कामाला राज्यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा- VIDEO: “स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू आणि…”, शरद पवारांचं नाव घेत सदावर्तेंचं मोठं वक्तव्य

संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावत नरेश म्हस्के म्हणाले, “सरकारकडून खूप चांगले निर्णय घेतले जात आहेत. त्यावर विरोधकांना टीका करता येत नाही. त्यामुळे आमच्यावर टीका करण्यासाठी त्यांनी एक माणूस नेमला आहे. तो माणूस नित्यनेमाने त्याचं काम करत असतो. पूर्वीच्या काळात मुंबईत गिरण्या होत्या. सकाळी सात वाजता गिरणीचा भोंगा वाजायचा. त्याच पद्धतीने आता साडे नऊ ते दहाच्या सुमारास एक भोंगा वाजतो. त्यांना नेमून दिलेलं काम ते करतात. इतर गोष्टींवर त्यांना टीका करता येत नाही. त्यामुळे ते नवनवीन विषय शोधत असतात, ते शोधक वृत्तीचे आहेत.”

हेही वाचा- “ज्या माणसाने दारू पिऊन…” जितेंद्र आव्हाडांची गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका!

“या सर्व प्रकारामध्ये शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत. ते ज्या पद्धतीने स्क्रीप्ट लिहून देतात, त्या पद्धतीने टीका केली जाते. सर्कसमध्ये विदूषक आणि इतर काही पात्रं असतात. ते ‘रिंग मास्टर’ सांगतो त्याप्रमाणे उड्या मारत असतात. त्याच पद्धतीने हे सर्वजण करत आहेत. त्यामुळे आम्ही तिकडे काही लक्ष देत नाही” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 16:54 IST

संबंधित बातम्या