Shiv Sena Symbol Case Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. आज (१२ ऑगस्ट) देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ‘विधिमंडळ पक्षातील फूट ही मूळ राजकीय पक्षातील फूट ठरू शकत नाही’, ‘एकनाथ शिंदेंची निवडच बेकायदेशीर’, अशा आदी मुद्यांवर कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला.
कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवलं. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवलं जात आहे’, असं नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
नरेश म्हस्के काय म्हणाले?
“सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या युक्तिवादामध्ये त्यांच्याकडे इतर कोणतेही मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पहिल्या दिवसांपासून ते हेच करत आहेत, त्यात वेगळं काहीही नाहीये. तसेच विधिमंडळ पक्षात फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा अशा पद्धतीचा त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. मात्र, मला याबाबत फक्त एवढंच सांगायचं की विधिमंडळ पक्षात त्यांच्याबरोबर कोणीही नव्हतं हे तर सिद्ध झालेलं आहे”, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
“राजकीय पक्षात किंवा संघटनेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त जिल्हा प्रमुख, नेते, उपनेते, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी असे सर्व पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करतात. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट जे म्हणत आहेत की फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडली, तर ते असं नाही, ९० टक्क्यापेक्षा जास्त संघटना एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहे”, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
“झालेल्या निवडणुकीत ६० आमदार, खासदार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही निवडून आलो आहोत, म्हणजे पक्ष संघटना आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, म्हणून आम्ही निवडून आलो. आम्ही फक्त लोकप्रतिनिधींच्या जीवावर निवडून आलेलो नाहीत. कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्याबरोबर होते म्हणून आम्ही निवडून आलो. मात्र, ठाकरेंच्या सेनेबरोबर कार्यकर्ते आणि पदाधिकारी नसल्यामुळे आज त्यांची ही अवस्था झाली आहे”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
“कपिल सिब्बल युक्तिवाद करत असताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जे शिल्लक खासदार आहेत, त्यांच्या चेहऱ्यांवर कशा पद्धतीने भावना निर्माण होत आहेत हे आपण पाहत आहोत. त्यांना वाटतं की आम्ही जिंकू. त्यामुळे कपिल सिब्बल जो युक्तिवाद करतात त्यावर हे खूश होत आहेत. आमचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा काय होतं ते कळेल”, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
“निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करणं मला तरी योग्य वाटत नाही. पहिल्या दिवसांपासून ठाकरे गटाने स्वत:ची जी कमतरता आहे, जे लोक यांना सोडून गेलेले आहेत, त्याचा विचार न करता प्रत्येकवेळी फक्त निवडणूक आयोगावर खापर फोडण्याचा प्रयत्न यांनी केला आहे आणि आज देखील तेच करत आहेत”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
