Narhari Zirwal on NCP Merger : अजित पवारांच्या निधनानंतर आता विखुरलेलं राहून चालणार नाही, अशी विलीनीकरणाबाबत सर्वांत आधी चर्चा सुरू करणारे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आता विलीनीकरणावर अत्यंत संयत भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर नरहरी झिरवळ अडचणीत सापडले होते. याप्रकरणी भाष्य करण्याकरता आज नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी विलीनीकरणावरही भाष्य केलं.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक देवगिरी बंगल्यावर घेतली. यावेळी काही आमदारांना त्या वैयक्तिक भेटल्या. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं समजत आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीही त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. या बैठकीत विलीनीकरणावर काही चर्चा झाली का? असा प्रश्न नरहरी झिरवळ यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “विलीनीकरणासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. परंतु, सध्या तरी विलीनीकरणाच्या चर्चेवर पूर्णविराम आहे.”

“अजितदादा दर मंगळवारी आमदारांची बैठक घ्यायची, त्यानुसार आज मंगळवारी सुनेत्रा पवार मुंबईत येणार असल्याने त्यांनी ही बैठक सोमवारी घेतली. प्रत्येकाच्या भौगौलिक परिस्थितीनुसार त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवारांनी केला. सर्व आमदारांनी मनमोकळेपणाने बोलावं म्हणून त्यांनी ही बैठक घेतली होती. पण सध्या कुठेच विलीनीकरणाची चर्चा नाही”, असंही नरहरी झिरवळ म्हणाले.

मंत्रालयातील लाचखोरीप्रकरणी झिरवळ काय म्हणाले?

“मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असं नरहरी झिरवळ यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. राजू ढेरिंगे याने स्वतःसाठी हे पैसे घेतल्याचं कबूल केलंय, असंही ते म्हणाले.

तसंच, नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद जाण्याकरता त्यांच्याविरोधात हा कट रचला असल्याची चर्चाही आहे. या चर्चेवर नरहरी झिरवळ म्हणाले, माझं कोणाबरोबर वैमनस्य नाही, मी कोणालाही स्पर्धक वाटत नाही. त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की कोणी मला मुद्दामून बदनाम करत नाही. मंत्रिपद काढण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांना माझं काम माहित आहे, त्यामुळे ते माझं मंत्रिपद काढणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.