Latest updates on Narhari Zirwal Viral Video controversy and Amol Mitkari’s reaction on political conspiracy : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांची एक अश्लील चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हा देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी मात्र झिरवाळ यांना लक्ष्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अमोल मिटकरी यांन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सध्या चांगलेच चर्चेत असलेले अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “भोंदू बाबाबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला झिरवाळ साहेबांचा व्हिडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला?” असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे, अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याचे अजित पवार यांनी ठरवले होते, असेही झिरवाळ यांनी जाहीर सांगितले आहे.
मिटकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये याबद्दल शंका व्यक्त केली असून झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात अशी इच्छा नरहरी झिरवाळ यांनी सर्वप्रथम व्यक्त केली होती, हे नमूद करत मिटकरींनी लिहिले की, “राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब! त्यानंतर त्यांच्या ऑफिस मध्ये ACB चा ट्रॅप लावणे व नंतर आता हा सात महिन्यापूर्वीचा व्हिडीओ काढून मीडियाला सोपवणे!! एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण?? अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणून स्वत:वरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतंय!”
व्हिडीओमध्ये काय आहे?
नरहरी झिरवाळ यांचा समाज माध्यमावर प्रसारित झालेला हा व्हिडीओ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीतील असून तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितीमध्ये दिसतो आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेला व्हिडीओ सात महिन्यापूर्वीचा आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर असून शेजारी खाद्य आणि मद्य आहे.
काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी,” असे सपकाळ म्हणाले आहेत.
