महामार्ग रुंदीकरणामुळे नाशिक-मुंबई प्रवास अवघ्या तीन ते चार तासांवर आला असताना नाशिक-मुंबई हवाई वाहतुकीस कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर, ओझर विमानतळ ‘नॉन प्रॉफिटेबल झोन’मध्ये प्रस्तावित करून ‘मोनो मेट्रो सीरिज’ हवाई जाळ्याद्वारे विकसित करण्याचा नवीन प्रस्ताव खा. हेमंत गोडसे यांनी राज्य विमान सेवेचे अपर मुख्य सचिव पी. एस. मिना यांच्याकडे दिला आहे. नाशिक जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला व फळबागा आहेत. त्यांच्या निर्यातीसह मुंबईहून येणाऱ्या कार्गो सेवेपैकी ३० टक्के सेवा ओझरला वळविण्यात येऊन हवाई वाहतूक वाढविण्याच्या दृष्टीने पुणे-नाशिक-दिल्ली, पुणे-नाशिक-मुंबई, हैदराबाद-नाशिक-दिल्ली अशा प्रकारची सक्ती विमान कंपन्यांना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रस्तावात केली आहे. ओझर विमानतळाचे काम पूर्ण होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या जागेत विमानतळाच्या टर्मिनल इमारत कामासाठी राज्य शासनाने कोटय़वधींचा निधी दिला आहे. या इमारतीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या विमानतळावरून हवाई सेवा सुरू होईल अशी चर्चा सुरू असली तरी याआधीचे अनुभव लक्षात घेता त्यात कितपत सातत्य राहील, हा प्रश्न आहे. कृषी, औद्योगिक विकासामुळे नाशिक हवाई नकाशावर यावे म्हणून प्रयत्न केले जात असले तरी विमान कंपन्यांकडून तसा प्रतिसाद मिळालेला नाही. या पाश्र्वभूमीवर, खा. गोडसे यांनी नव्या प्रस्तावाद्वारे या विमानतळाचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष वेधले आहे.