मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाईची तयारी आधीपासून सुरू होती. पोलिसांनी पूर्व नियोजन ही कारवाई केली असून या गंभीर प्रकरणात कोणाचा दुरान्वये संबंध जरी आला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. याप्रकणी मंगळवारी विधिमंडळात सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून सरकारची भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.
भोंदूबाबाअशोक खरातने महिलांचे शोषण केल्याबाबत विजय वडेट्टीवार, नाना पटोल, भास्कर जाधव आदी सदस्यांनी स्थगत प्रस्तावाच्या माध्यमातून या गंभीर विषयावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तथाकथिक भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अतिशय गंभीर असून यासंदर्भात सगळी माहिती काढण्याचे काम सुरू आहे. या अशोक खरातने त्याच्या तथाकथित शक्तीचा उपयोग-दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिलांबरोबर गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची कारवाई पोलिसांनी पूर्व नियोजन करून केली आहे.
या घटनेत महिलांचा समावेश असल्यामुळे म्हणजेच महिलांची फसवणूक झाल्याने त्या तक्रार करण्यासाठी पुढे यायला तयार नव्हत्या. पण पोलिसांनी धीर दिल्यानंतर त्यातील काही महिलांनी तक्रार दाखल केली. आणखी काही महिला तक्रार देतील. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन केले जाईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
या प्रकरणात अशोक खरातवर कारवाई जरी आता झाली असली तरी त्याची तयारी आधीपासून सुरू होती. खरातच्या अटकेच्या आधी म्हणजे १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातून एका तक्रारीचा उपयोग करून खरात देशाबाहेर पळून जावू नये यासाठी लूट आऊट नोटीस जारी करण्यात आली होती असेही फडणवीस यांनी सांगितले. हा राजकारणाचा मुद्दा नाही. कारण हा महिलांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाचा दुरान्वये सबंध आला तरी त्याला सोडणार नाही असा इशारा देतानाच विरोधकांनीही याचे राजकारण करु नये असे आवाहन फडणवीस यांनी केले.
खरातशी संबंधितांना सहआरोपी करा, काँग्रेसची मागणी
स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ही प्रश्न सभागृहात मांडताना भोंदूबाबा अशोक खरातशी सबंधितांना, मंत्री, अधिकाऱ्यांना या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी तर पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला भोंदूगिरीचा बाजार आणि त्याला मिळणारे राजकीय व प्रशासकीय संरक्षण ही राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे सांगितले.
खरात याने धर्माच्या नावाखाली मांडलेला बाजार आणि त्याला साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी व मंत्री यांना या प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. खरात याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी बैठक घेत होते.
महसूल आणि पोलिस अधिकारी देखील खरातची अटक होऊ नये प्रयत्न करत होते. त्यामुळे या प्रकरणात केवळ भोंदू बाबाच नाही, तर त्याला आश्रय देणारे सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी सामील आहेत. हे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, मात्र प्रत्यक्षात भोंदू बाबांच्या पाया पडताना दिसतात. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे वडेट्टीवर यांनी सांगितले.
या प्रकणात संबंधित सर्व आरोपींचे आणि संशयित अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावे. ज्या मंत्र्यांनी भोंदू बाबाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांना सहआरोपी करावे. यात कोणी कितीही मोठा नेता असला तरी त्याला सोडू नका अशी मागणीही नाना पटोले आणि भास्कर जाधव त्यांनी केली.
