स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातकडे काम करणारा माजी कर्मचारी हा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलला वाचा फोडणारा व्यक्ती ठरला आहे. कारण त्याने रविवारी नाशिकच्या पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल केली आहे. ज्यात अशोक खरातने त्याच्या परिचयातील गरोदर महिलेचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली आहे. अशोक खरातने असा प्रकार केल्याचं मला समजलं तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये मी छुपा कॅमेरा लावला. ज्यामध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण असल्याच्या घटना कैद झाल्या आहेत. हे सगळं फुटेज मी पोलिसांना दिल्याचं या माजी कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.

अशोक खरातकडे काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने काय सांगितलं?

पोलिसांना दिलेल्या फुटेजमध्ये १०० हून अधिक व्हिडीओ आहेत. या क्लिपमधल्या महिलांना आधी एक पदार्थ सेवन करायला दिला जातो त्यानंतर त्या गोंधळून जातात, त्यांना नीट शुद्ध रहात नाही. त्यानंतर या महिलांचा गैरफायदा घेऊन अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करताना दिसतो आहे. माझ्यात पवित्र शक्ती आहे, तू माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाहीस तर तुझ्यावर कोप होईल, तुझ्या नवऱ्याला आयुष्य लाभणार नाही असं भोंदू खरात महिलांना सांगायचा अशी माहितीही या माजी कर्मचाऱ्याने दिली आहे.

आणखी एका महिलेची तक्रार

दरम्यान रविवारी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी एका महिलेने खरात विरोधात तक्रार केली आहे. २०२० ते २०२६ च्या कालावधीत अशोक खरातने माझ्यावर वारंवार बलात्कार केला असा आरोप या महिलेने केला आहे. पूजा आणि धार्मिक विधी करायचे आहेत असं सांगून खरात बलात्कार करायचा असं या महिलेने म्हटलं आहे. गुंगी आणणारा पदार्थ देऊन तो आपल्याला हे सगळं करायला लावायचा. तू माझं ऐकलं नाहीस तर मुलांना ठार करेन, त्यांना इजा पोहचवेन असंही अशोक खरात सांगायचा असा आरोप या महिलेने केला आहे. एवढंच नाही तर अशोक खरातने काही गोळ्या खायला दिल्या ज्यामुळे माझा गर्भपात झाला अशी तक्रारही सदर पीडितेने दिली आहे. रविवारी जो गुन्हा दाखल झाला तो धरुन अशोक खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी कर्मचाऱ्याने अशोक खरातबाबत काय सांगितलं?

अशोक खरातकडे काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने हे सांगितलं की मी २०१९ मध्ये अशोक खरातकडे कामाला लागलो होतो. माझ्याकडे दैवी शक्ती आहेत असं तेव्हा मला अशोक खरातने भासवलं होतं. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यायच्या हे मी पाहिलं आहे असंही या कर्मचाऱ्याने सांगितलं. तसंच त्याने अशीही माहिती दिली की या भोंदू अशोक खरातला भेटायला जर नवरा-बायको आले तर सुरुवातीला दोघांना एका केबीनमध्ये तो घेऊन जायचा. त्यानंतर मग पुरुषाला त्या केबीनमधून बाहेर जायला सांगायचा. अनेक महिला एकट्याही येत होत्या अशी माहितीही या माजी कर्मचाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली.

गरोदर महिलेचं शोषण आणि मग कर्मचाऱ्याने कॅमेरा कसा लावला?

२०२३ मध्ये एका महिलेने तिचं शोषण कसं झालं हे देखील तक्रारीत सांगितलं आहे. या महिलेने सांगितलं की ती गरोदर होती. तिला खरातने पूजा करायची आहे असंसांगितलं. त्यावेळी कर्मचाऱ्याला बाहेर काढलं. जेव्हा सगळे बाहेर गेले तेव्हा अशोक खरात आणि ती महिलाच होती. खरातने लाइट बंद केले, तिला डोळे बंद करायला सांगितलं. त्यानंतर खरातने तिला मिठी मारली आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. मी तुझ्या होणाऱ्या बाळाची तपासणी करतोय असं त्याने तिला सांगितलं. मात्र त्या महिलेने खरातला विरोध केला आणि ती बाहेर पडली. तिने मला ही हकीकत सांगितली तेव्हा माझा सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण तिने जेव्हा होणाऱ्या बाळाची शपथ घेतली तेव्हा माझा त्या महिलेवर विश्वास बसला. यानंतर खरातच्या कारनाम्यांकडे मी लक्ष ठेवू लागलो असं या माजी कर्मचाऱ्याने सांगितलं.

लाख रुपयांना चिंचोके विकायचा, पवित्र खडे आहेत सांगायचा अशोक खरात

या कर्मचाऱ्याने असाही आरोप केला आहे की खरात पूजा विधींच्या नावाखाली घोटाळेच करायचा. चिंचोके स्वच्छ करायचा आणि हे अनमोल खडे आहेत सांगायचा आणि लाख रुपये घ्यायचा. खरातचे काळे धंदे कळल्यानंतर मी त्याच्या ऑफिसमध्ये छुपा कॅमेरा लावला असं या माजी कर्मचाऱ्याने सांगितलं. २०२४ मध्ये माझं आणि खरातचं भांडण झालं होतं.मी असल्या कामांमध्ये आता पडणार नाही असं सांगितल्यावर त्याने मला कामावरुन काढलं असं या कर्मचाऱ्याने सांगितलं. मला त्याने दोन महिन्यांचा पगारही न देता हाकलवून लावलं. एवढंच नाही तर जे काही फुटेज तू घेतलं आहे ते दे तसं केलं नाहीस तर तुझ्या कुटुंबाला आणि तुला ठार करेन अशी धमकीही दिली असंही या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. या कर्मचाऱ्याने जी सतर्कता दाखवली त्यामुळे या भोंदूबाबाचा पर्दाफाश होण्यास मदत झाली आहे.

२०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत काय घडलं?

दरम्यान २०२५ मध्ये अशोक खरातने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्याला अश्लील चित्रफिती दाखवून ब्लॅकमेल केलं जातं आहे आणि त्या बदल्यात ५ कोटींची रक्कम मागितली जाते आहे असं त्याने सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी फेब्रुवारी २०२६ ला एका व्यक्तीला अटक केली. फोटोंचं मॉर्फिंग करुन धमकावल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर १३ मार्चला सरकारने या प्रकरणी एक विशेष तपास समिती अर्थात SIT नेमली होती. १७ मार्चला एका महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात येऊन २०२२ ते २०२५ या कालावधीत कसे अत्याचार केले ते सांगितलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांना रोख रक्कम, हत्यारं, मालमत्तांची कागदपत्रं असं सगळं तपासात सापडलं जे त्यांनी जप्त केलं. तसंच अशोक खरातलाही अटक करण्यात आली. आता या प्रकरणातले अनेक कंगोरे आणि धागेदोरे समोर येत आहेत.