मुंबई: नाशिक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषध खरेदी प्रक्रियेत चार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी विधान परिषदेत केला. अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही एकाच कंपनीकडून औषधांची खरेदी करण्यात आली. यावर आरोग्य विभागाकडून समाधानकारक उत्तर न अल्याने चौकशीची मागणी करण्यात आली.

यावर सभापती राम शिंदे यांनी तातडीने चौकशीचे करण्याचे आदेश देतानाच वस्तुस्थिती सभागृहात मांडण्याचे आदेश दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. नाशिकमध्ये सन २०२४–२५ या वर्षात औषध खरेदी प्रक्रियेत ४ कोटींची अनियमितता झाल्याचा मुद्दा आमदार पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी संबधित फाईलवर आक्षेप नोंदवला होता, तरीही एकाच कंपनीकडून बहुतांश औषधांची खरेदी करण्यात आली.

तांत्रिक मान्यतेसाठी दिलेला निविदा क्रमांक आणि प्रत्यक्ष पुरवठा आदेशातील क्रमांकात मोठी तफावत आढळून आली. निविदेला अधिकृत प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वीच घाईघाईने खरेदी प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप केला; परंतु सरकारने त्यावर लेखी उत्तर आले नसल्याचे छापील पुस्तकात नमूद केले. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी यावर शासनाच्या कारभारावर सडकून टीका केली.

आमदार अनिल परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना, सरकार गंभीर नसल्याचा मुद्दा मांडला. तसेच तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यावर सभापती राम शिंदे यांनी, सदस्यांना प्रश्नांची उत्तरे वेळेत न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करताना या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तूस्थिती सभागृहासमोर मांडली जाईल, असे स्पष्ट केले.