scorecardresearch

नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ठाकरे गट शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ठाकरे गट शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता
उद्धव ठाकरे आणि शुभांगी पाटील (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याबाबत मातोश्रीवर शुभांगी पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा?

भाजपा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे मूळच्या भाजपा पक्षातील नेत्या शुभांगी पाटील यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी शुभांगी पाटील यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी अन्य हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे आणि शुभांगी पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यास तयारी दर्शवल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा पाठिंबा अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>> नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाचा कोणाला पाठिंबा? देवेंद्र फडणीसांचे सूचक विधान; म्हणाले, “बघत राहा, योग्य वेळी…”

सध्यातरी मी अपक्षच- शुभांगी पाटील

उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. मला कोणत्याही पक्षाचा ए बी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे मी सध्यातरी अपक्षच निवडणूक लढवत आहे. मी पाठिंब्यासाठी सर्वच पक्षांकडे विनंती करत आहे. माझी सर्वांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ठाकरे गटाचे नेते पाठिंब्याबाबत माध्यमांना कळवतील.” अशी माहिती शुभांगी पाटील यांनी दिली. तसेच मी या निवडणुकीत विजयी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून मी पहिली महिला आमदार असेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> ‘आम्हाला एकनिष्ठ उमेदवार हवा,’ शिक्षक सेनेची भूमिका; सत्यजित तांबेंना नाशिकची पदवीधरची निवडणूक कठीण जाणार?

राष्ट्रवादी, काँग्रेसची काय भूमिका

दरम्यान, ठाकरे गट शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची याबाबत काय भूमिका असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच शुभांगी पाटील यांना ठाकरे गट पाठिंबा देत असेल तर भाजपाचा पाठिंबा कोणाला असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 15:22 IST

संबंधित बातम्या