धुळे सुरत महामार्गावरच्या विसरवाडी या ठिकाणी काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भरधाव स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारचा वेग इतका प्रचंड होता की चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाच ते सहा वेळा पलटी झाली.
आकाश पाटील या तरुणाचा मृत्यू
धुळे सुरत मार्गावरील भीषण दुर्घटनेत आकाश पाटील या तरुणाचा मृत्यू झाला असून रोहित वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना विसरवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातग्रस्त कार क्रमांक GJ 26 AB 4424 मध्ये मद्याचे खोके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळेंनी काय सांगितलं?
सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना गुजरातच्या सोनगड या ठिकाणी नेण्यात आलं आहे. दरम्यान स्विफ्ट कार चालवणारा आकाश पाटील हा तरुण अपघातात ठार झाला आहे. कारचा वेग इतका प्रचंड होता की कारने अपघातानंतर पाच ते सहा वेळा पलटी मारली. रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन लोक या घटनेत जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात BNS कलम २८१ च्या अंतर्गत आणि कलम १२५ च्या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

