इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करून तसेच कुटुंबाला मारहाण करणाऱ्या गुंडाच्या हैदोसाचा आणखी एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावरती ४ ते पाच वेळा जीवघेणा हल्ला करून महिलेचा विनयभंग त्रास देणाऱ्या या गुंडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पर्यटकांना इगतपुरीच्या भावली परिसरातातील टवाळखोरांनी पाठलाग करत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकाने या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे.
भावली धरण छेडछाड नवा व्हिडीओ समोर
घटनेचा सगळा थरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसतोय आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवरून हायवेवर पडताना दिसतोय. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे तर आणखी काही आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणातील फिर्यादींनी देखील त्यांच्या फिर्यादीत या घटनेचा उल्लेख केला होता. आता त्याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडिओ रस्त्यावरील नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केल्याची माहिती आहे. नऊ जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणातील आणखी तीन आरोपींची नावे समोर आलेली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. काही आरोपी वाडा, भिवंडी परिसरात तर काहीजण लॉजमध्ये बनावट नावाने वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
नेमकी घटना काय?
नाशिकमधील इगतपुरी जवळील भावली धरणाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबाला अत्यंत धक्कादायक आणि थरारक अनुभवाला सामोरे जावं लागलं. एका महिलेची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्यामुळे, संतप्त झालेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने या पीडित कुटुंबाचा तब्बल २५ ते ३० किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. इतकेच नव्हे, तर चालत्या गाडीवर रॉड आणि बेसबॉल बॅटने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने नेमकं काय सांगितलं?
आपल्यावर ओढवलेल्या थरारक प्रसंगाचा घटनाक्रम या महिलेनं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. महिलेनं सांगितलं की, परवा आम्ही फिरायला गेलो होतो. दुपारी दोन वाजता इच्छित स्थळी पोहोचलो. आमच्या मुलांनी धबधबा एन्जॉय केला. त्यानंतर मी कपडे बदलायला गेले, त्यावेळी माझ्यावर दोन जणांनी कमेंट पास केली. त्यानंतर त्यांनी परत माझ्यावर कमेंट केली. नेमकं काय झालंय हे पाहायला मग माझे पती आले आणि त्यांनी या गुडांना जाब विचारला. त्यावेळी आमच्यासमोर एका दुकानावर ८ ते १० जण उभे होते. त्यांनी माझ्या पतीसोबत हातपाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे एक बलेनो गाडी आली, त्यातून एकानं हातानं आमच्या गाडीच्या काचा फोडल्या. पुढे गेल्यावर त्यांनी आमचा पाठलाग केला. रॉडनं आमच्या गाडीवर हल्ला केला. पहिल्यांदा आमच्यावर भावली डॅम इथं या गुडांनी हल्ला केला. नंतर टोल नाक्यावर हल्ला केला, नंतर पुन्हा दगड मारून हल्ला केला. शेवटी आम्ही जीव वाचवण्यासाठी बॅरिकेड्स तोडून तिथून पळालो. नंतरही ते आमच्या पुढे आले. मग आम्ही मुंबईच्या बाजूला गाडी वळवली आणि पळालो. त्यातील एक जण आमच्या गाडीला लटकला. आम्ही थांबू सुद्धा शकत नव्हतो
