मुंबई: नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात सर्वसामान्यांच्या हक्काची घरे हडपण्याचा प्रकार काही विकासकांकडून करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. सर्वसामान्यांची घरे लाटणाऱ्या विकासकांना सोडणार नाही. या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात दिला जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सर्वसामान्यांसाठी असलेली २० टक्के घरे बळकावली गेली आहेत. एकाच दिवसात जमिनीचे तुकडे पाडणे, नोंदी घेणे आणि नकाशे मंजूर करणे ही मोठी साखळी आहे. या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दोन सनदी अधिकारी आणि एक आयपीएस अधिकारी यांचा या एसआयटीमध्ये समावेश असून १५ दिवसांत अहवाल येईल. लाचलुचपत विभाग आणि भूमी अभिलेख विभागातून या घोटाळ्याची सुरुवात झाली असून, नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ शिक्षा नाही, तर बिल्डरांकडून २० टक्के घरे मिळवून ती सर्वसामान्यांसाठी खुली केली जातील, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
धनदांडग्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये
ज्या शेतकऱ्यांनी शेतघरासाठी कर्ज घेतले आहे. ज्यांनी मर्सिडीज गाड्या घेतल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये. शेतकरी ट्रॅक्टर घेतो, चार चाकी वाहन घेतो याला कुणी काही म्हणणार नाही; पण कर्जमाफी मागताना धनदांडगे लोक ज्यांची ऐपत आहे. तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्यांच्या अधिक जास्त फायदा होऊ शकतो. गरीब शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी ही माझी भावना आहे, मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी केले. आपल्याकडे ८० एकर शेती असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत; प्रत्यक्षात आपल्याकडे २८ एकरच जमीन आहे. जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितांविरोधात १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
खरात प्रकरणात महसूल अधिकारी दोषी असल्यास कारवाई
अशोक खरात प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये एसआयटी तपास करत असून कोणीही सुटणार नाही. महसूल विभागातील अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते एसआयटीला द्यावेत असेही ते म्हणाले.
