केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या खळबळजनक विधानानंतर त्यांच्याविरोधात नाशिकमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. याबाबात नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलातना माहिती दिली दीपक पांडेय यांनी आज माहिती दिली.

पोलीस आयुक्त म्हणाले, “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहरात जो गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी जे पथक गेलं होतं. ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी पोहचली होती आणि तिथे पोहचल्यानंतर पथकाला समजलं की, नारायण राणेंना रायगड पोलीस ताब्यात घेऊन गेलेले आहेत आणि महाड येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या संदर्भात त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार होतं. या प्रकरणाची सुनावणी काल रात्री उशीरापर्यंत चालली. जेव्हा न्यायालयाकडून नारायण राणेंना जामीन देण्यात आलं व त्यामध्ये अशी अट टाकण्यात आली की या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही, मग त्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील भूमिकेत बदल करून नारायण राणेंना २ सप्टेंबर रोजी, दुपारी १२ वाजेच्या आत पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा जबाब नोंदवण्याची विनंती केलेली आहे. केंद्रीयमंत्री राणेंनी हे मान्य केलं आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की नारायण राणे हे २ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये येतील व तपास प्रक्रियेत सहभागी होतील.”

नारायण राणेंना कायद्यानुसार अटक करण्याची प्रक्रिया सुरू; नाशिकच्या पोलीस आयुक्तांची माहिती

मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी  नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काल दिली होती. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचं गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आहे असं ते म्हणाले होते. तसेच, राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं होतं.