Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे. मात्र, याच अशोक खरात बरोबर अनेक राजकीय नेत्यांचे फोटोही समोर आलेले आहेत. त्यामुळे यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर अशोक खरात प्रकरणात काही नेत्यांची चौकशी होऊ शकते का? याचा खुलासा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत संदीप कर्णिक यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय म्हणाले?
अशोक खरात प्रकरणात काही नेत्यांनी चौकशी होऊ शकते का? या प्रश्नावर बोलताना संदीप कर्णिक म्हणाले की, “जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा खरातबरोबर फक्त फोटो आहे म्हणून त्या व्यक्तीवर संशय घेऊ शकत नाहीत किंवा म्हणून त्या व्यक्तीला आपण आरोपीच्या कटघरात उभं करू शकत नाहीत. मात्र, तपासात जर एखादी लिंक आली किंवा असा संशय आला की एखादा व्यक्ती यामध्ये सहभागी असू शकतो तर नक्कीच एसआयटी कोणाचीही गय करणार नाही, तशा गृहमंत्र्यांच्या आणि पोलीस महासंचालकांच्या सूचना देखील आहेत. कायद्यासमोर सर्वजण समान असतात”, असं सूचक भाष्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं आहे.
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ नक्की बाहेर कसे आले?
पुढे बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की, “या व्हिडीओचा प्रकार आहे तो खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिसबॉय होता त्याच्या ७ महिने गर्भवती असलेल्या पत्नीचा खरातने विनयभंग केला. त्यावेळी तो खरातच्या विरोधात गेला आणि त्याने काही रेकॉर्डिंग्ज केले. ते व्हिडीओ त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. कारण खरात त्याच्यावर दबाव आणत होता. त्याला स्वत:ला, त्याच्या बायको आणि मुलांना मारण्याची धमकी त्याने दिली होती. खरातने धमकी दिल्याने माझ्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर आपण हे व्हिडीओ बाहेर आणा असे म्हणून ऑफिस बॉयने वेगवेगळ्या ठिकाणी हे व्हिडीओ ठेवलेले होते. पुढे ज्यांच्याकडे हे वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडीओ ठेवले होते तेही कदाचित टार्गेटवर आले आणि त्यांनीही आपल्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर हे व्हिडीओ बाहेर आणा असे म्हणून इतर दोन-चार ठिकाणी ते ठेवले. जेणेकरून हे प्रकरण दबलं जाणार नाही. मला वाटतं अशातून कुठूनतरी हे व्हिडीओ बाहेर आले आहेत. पोलिसांनी एकही व्हिडीओ ओपन केलेला नाही”, असं कर्णिक यांनी स्पष्ट केलं आहे.
