अकोले : नाशिक–पुणे जलदगती रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर– संगमनेर (अकोले)– नारायणगाव – मंचर– चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे जोडणी द्यावी, अशी मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, खासदार अमोल कोल्हे, खासदार भास्कर भगरे यांनी एकत्रितपणे नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली.

या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, ‘जीएमआरटी’चे संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे नमूद केले.

संसदेत उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाला शिर्डी आणि अहिल्यानगरमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला असून, नारायणगावजवळील संवेदनशील रेडिओ-क्षेत्रामुळे हा बदल करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, या वळवलेल्या मार्गामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू, प्रवासाचा कालावधी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने होणारी प्रचंड हानी याकडे लक्ष वेधत नाशिक–पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक त्रिकोणाचा कणा आहे. लाखो प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या दोन शहरांदरम्यान दैनंदिन प्रवास करतात. शिर्डीमार्गे वळवण्यामुळे या सर्वांच्या हितावर गदा येणार आहे, त्यामुळे हा मार्ग थेटच असावा अशी मागणी चौघा खासदारांनी केली आहे.

नाशिक-पुणे या रेल्वे मार्गाच्या मूळ प्रस्तावात बदल करून तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे वळवण्यात आल्याच्या तीव्र प्रतिक्रिया अकोले व संगमनेरमध्ये उमटल्या आहेत. याबरोबरच पुणे व नाशिक जिल्ह्यातही आंदोलने सुरू झाली आहेत. मंगळवारी अकोले शहरात कडकडीत बंद पाळून संगमनेरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर अकोल्यातील सर्वपक्षीयांनी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले होते.

सुमारे पाच वर्षांपूर्वी महारेलने नाशिक-पुणे या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला तेव्हा हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून जाणार होता. तसेच तालुक्यातील देवठाण येथे रेल्वे स्थानक प्रस्तावित होते. पण नंतर या रेल्वेचा संगमनेर तालुक्यातील मार्ग बदलण्यात आला आणि प्रस्तावतून देवठाण स्थानकासह अकोले तालुका गायब झाला. मूळ सर्व्हेक्षणाप्रमाणे रेल्वे मार्ग व्हावा ही अकोलेकरांची मागणी असून अकोले रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून त्यासाठी आंदोलन सुरू आहे.