अकोले : नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी, रेल्वेमंत्र्याच्या दिल्लीतील भेटीनंतर समाज माध्यमावर जाहीर केले आहे. या प्रस्तावाचा फेरविचार व्हावा व नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मुळ प्रस्तावाप्रमाणे अकोले तालुक्यातून जावा तसेच या रेल्वेमार्गावर तालुक्यातील देवठाण तसेच बोटा (संगमनेर) ही स्थानके असावीत अशी अकोलेकरांची मागणी आहे.
मंत्री विखे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची नवीदिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिक–पुणे जलदगती रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्र्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. या प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गात अलीकडे करण्यात आलेल्या बदलाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, हीबाब यापूर्वीच मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे स्थानिक जनभावना, विकासाचा समतोल आणि परिसराच्या हिताचा विचार करून रेल्वेमार्ग पहिल्या प्रस्तावित मार्गानुसारच ठेवावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्याचे विखे यांनी त्यांच्या समाज माध्यमावर सांगितले आहे. नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मुळ सर्वेक्षणाप्रमाणे नाशिक-सिन्नर-देवठाण (अकोले)- संगमनेर मार्गे जाणार होता. महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार खर्चाचा पन्नास-पन्नास टक्के वाटा उचलणार होते.
मात्र या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावात दोनवेळा बदल झाले. त्यामुळे प्रस्तावित रेल्वेमार्ग अकोल्यापासून दूर गेला. देवठाण स्थानक रेल्वे मार्गाच्या प्रस्तावातून गायब झाले. साहजिकच याची तीव्र प्रतिक्रिया अकोले तालुक्यात उमटली. अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून याविरुद्ध आंदोलन छेडण्यात आले. अकोले ते संगमनेर असा पंचवीस किलोमीटर मोर्चा काढण्यात आला होता.
मध्यंतरी अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असताना देवठाण येथील कार्यक्रमात मंत्री विखे यांनी रेल्वे मुळ प्रस्तावाप्रमाणे देवठाण मधूनच जाईल, असे जाहीर केले होते. रेल्वेप्रश्नी बोटा येथे झालेल्या आंदोलनावेळी या प्रश्नावर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेट घडवून आणण्याचे आश्वासन दूरधनीवरून आंदोलकांना दिले होते. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या भेटीची तारीख निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्र्यांची या प्रश्नावरील भूमिका महत्वाची असणार आहे.

