Nashik TCS BPO Case Updates: नाशिकमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या बीपीओमधील महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. तर एकूण आठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणात आता अटकेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची बाजू समोर आली आहे. दानिश शेख आणि एका तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध बिघडल्यानंतर माझ्या पतीसह इतरांचे आयुष्यही उध्वस्त झाले, अशी खंत अटकेत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना कर्मचाऱ्याच्या पत्नीने नाव न उघड करण्याच्या अटीवर या प्रकरणाबाबत काही दावे केले आहेत. तिने म्हटले, माझे पती गुन्ह्याच्या प्रकारात सहभागी नाहीत. एकमेकांशी संबंधित नसलेले प्रकरणे एकत्र केली आहेत. अटकेत असलेला कर्मचारी नाशिकच्या टीसीएसमधील बीपीओ युनिटमध्ये वरिष्ठ कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या नऊ एफआयआरपैकी दानिश शेखवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणाची कंपनीअंतर्गत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच सर्व सात कर्मचाऱ्यांना तात्काळ कंपनीतून काढून टाकले.
कर्मचाऱ्याच्या पत्नीने पुढे सांगितले, दानिश आणि तक्रारदार महिलेच्या प्रेमसंबंधाबाबत कंपनीतील अनेकांना कल्पना होती. माझ्या पतीने सांगितले की, तक्रारदार महिला तिचे काम संपल्यानंतर दानिशचे अनेक तास वाट पाहत असे. दानिशबद्दल तिला जवळीक वाटत असल्यामुळे तक्रारदार महिलेने रमजान महिन्यात उपवास ठेवणे आणि त्यापद्धतीचे कपडे घालण्यास सुरुवात केली होती. ज्याचा तिच्या पालकांना प्रचंड त्रास होत होता.

फेब्रुवारी महिन्यात भांडण, संबंध बिघडले
फेब्रुवारी महिन्यात दानिश आणि तक्रारदार महिलेत भांडण झाले, त्यानंतर तिचे आई-वडील एका स्थानिक राजकीय नेत्याकडे गेले, असे कर्मचाऱ्याच्या पत्नीने सांगितले. त्यांनी मुलीला पोलिसांत तक्रार देण्यासाठी तयार केले. यामुळे इतर काही जण आण माझ्या पतीचा कोणताही दोष नसतानाही त्यांना अटक करण्यात आली.
अटकेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या काकांनीही त्यांना फेब्रुवारीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल माहिती असल्याचे म्हटले. ते म्हणाले, माझ्या पुतण्याने त्याच्या बीपीओमधील एका कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या मैत्रिणीच्या भांडणावरून एफआयआर झाल्याची कल्पना दिली होती. या प्रकाराशी त्याचा काहीही संबंध नसल्याचेही त्याने आम्हाला सांगितले होते. आम्ही त्याला पोलिसांना सहकार्य करण्याचा सल्ला दिला.
अटकेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने पुढे म्हटले की, दानिशच्या विरोधातील एफआयआरचा तपास सुरू असताना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात माझे पती सुट्टीवर होते. त्यांना सुट्टीवरून परत बोलावण्यात आले. माझे पती बीपीओमध्ये वरिष्ठ पदावर असून ते दानिशला व्यक्तीशः ओळखत नव्हते. त्यांचा संवाद केवळ औपचारिक संभाषणापुरता मर्यादित होता. १ एप्रिल रोजी पोलिसांनी पतीला फोन करून सांगितले की, त्यांचा तपास पूर्ण झाला आहे आणि वरिष्ठ पदावर असल्यामुळे माझ्या पतीची त्यांना स्वाक्षरी हवी आहे.
पत्नीने पुढे म्हटले की, आमच्या घरी त्यादिवशी कौटुंबिक सोहळा सुरू होता. तरीही माझे पती सायंकाळी ६.३० वाजता पोलीस ठाण्यात स्वाक्षरी करण्यासाठी गेले. काही तासांनी मी त्यांना फोन केला असता ते म्हणाले की, आणखी काही सहकाऱ्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात बोलावले आहे. काही वेळातच तो तिथून निघेल, असेही त्यांनी म्हटले. पण रात्री ११.३० वाजता फोन केला असता त्यांना अटक झाल्याचे कळले.
अटक झाल्याची माहिती मिळताच मी पोलीस ठाण्यात धाव घेतली. माझ्या पतीचा यात काहीही दोष नाही, असे पोलिसांना सांगितले. रात्रीच्या अडीच वाजता पोलिसांनी मला माहिती दिली. ते म्हणाले, दानिशच्या एफआयआर व्यतिरिक्त आणखी काही महिलांनी तक्रार केली असून त्या तक्रारीच्या आधारावर माझ्या पतीला अटक केली आहे, अशीही माहिती अटकेतील कर्मचाऱ्याच्या पत्नीने दिली.
माझे पती फक्त शाकाहारी जेवण न्यायचे
इतर एफआयआरमध्ये जे आरोप करण्यात आले आहेत, त्याबाबत बोलताना पत्नीने सांगितले, “आम्हाला ११ वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांचा मुलगा आहे. असे असताना एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे तो इतर महिलांना अशी वागणूक का देईल? तसेच माझे पती जेवणाच्या डब्यात नेहमीच शाकाहारी जेवण नेत होते. मांसाहारी जेवण नेले तर माझ्या सहकाऱ्यांना कदाचित ते आवडणार नाही, असे ते म्हणायचे. असा व्यक्ती इतर धर्माबद्दल वाईट का बोलेल?”
