TCS Nashik Case Charge Sheet: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी असणाऱ्या ‘टीसीएस’ च्या नाशिक कार्यालयातील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. फरार आरोपी निदा खान हिला लपण्यास मदत केल्याच्या चौकशीदरम्यान हा प्रकार समोर आला असून, जलील यांनी मात्र आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

नाशिक पोलिसांनी या बहुचर्चित प्रकरणात दाखल एकूण ९ गुन्ह्यांपैकी पहिल्या गुन्ह्यात सुमारे ३,५०० पानांचे तब्बल पहिले आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या पहिल्या गुन्ह्यात बलात्कार, धार्मिक भावना दुखावणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

‘इम्तियाज जलील साहेबांना विचारावं लागेल’

आरोपपत्रातील माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक न्यायालयाने फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांनी निदाला पोलिसांपासून लपवण्यासाठी थारा दिल्याचे समोर आले.

जेव्हा गुन्हे शाखेने मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर येथे चौकशीसाठी बोलावले आणि निदा खान कुठे आहे, असे विचारले; तेव्हा पटेल यांनी वारंवार एकच उत्तर दिले, “इम्तियाज जलील साहेबांना विचारावं लागेल.” कसून चौकशी केल्यानंतर मतीन पटेल यांनी पोलिसांना छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव-कौसर सिडको भागातील त्या जागेचा पत्ता दिला, जिथे निदा आणि तिचे कुटुंबीय लपले होते. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून निदा खान, तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांना ताब्यात घेतले.

महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामावर हातोडा

निदा खान ज्या घरात लपली होती, ते घर आणि मतीन पटेल यांच्याशी संबंधित इतर दोन मालमत्तांवर स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई करत हातोडा चालवला. हे घर हनिफ खान यांच्या मालकीचे होते, ज्यांनी ते मतीन पटेल यांना वापरण्यासाठी दिले होते. यानंतर पोलिसांनी हनिफ खान यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि जलील यांची भूमिका

इम्तियाज जलील यांनी निदा खानच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचं नाकारलेलं नाही. २१ एप्रिल रोजी त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, आपण पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. तसेच प्रशासनाने केलेल्या घरतोडीच्या कारवाईविरोधात त्यांनी आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. एका सभेत बोलताना जलील म्हणाले होते, “आम्ही हा लढा कायदेशीररित्या लढू. पक्ष मतीन यांना त्याच जागी यापेक्षा मोठे आणि चांगले घर बांधून देईल.”

या संपूर्ण प्रकरणावर सध्या सौदी अरेबियात हज यात्रेसाठी गेलेले इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे:

“माझे नाव आरोपपत्रात आल्याची मला कल्पना नाही. पण मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी आधीच मान्य केले आहे की मी त्या मुलीच्या (निदाच्या) कुटुंबाला भेटलो होतो आणि जे मला योग्य वाटते, त्यासाठी माझा लढा सुरूच राहील.” दुसरीकडे, मतीन पटेल यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले की, “जलील हे पक्षाचे अध्यक्ष असल्याने पटेल यांनी त्यांचे नाव घेतले असावे. यात कोणताही कट नाही, याला केवळ राजकीय रंग दिला जात आहे.”

तक्रारदार तरुणीची धक्कादायक खुलासे!

आरोपपत्रात पीडित तरुणीने मुख्य आरोपी डॅनिश शेख याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जुलै २०२२ मध्ये खंडोबा हिल येथे डॅनिशने पहिल्यांदा तिचा छळ केला. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्र्यंबक रोड येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

याशिवाय डॅनिशने तिची आर्थिक पिळवणूकही केली. हॉटेल, कॅफेचे बिल आणि घरगुती किराणा सामानाचा खर्च ती करायची. तिने त्याला महागडी घड्याळे आणि बॅग्ज भेट दिल्या होत्या. डॅनिशने घर घेण्यासाठी आणि इतर कारणांसाठी तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. संपूर्ण नात्यादरम्यान तिचे २.२ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

‘अल्लाह तुम्हाला जहन्नममध्ये पाठवेल…’ धर्मांतरासाठी दबाव

या प्रकरणात निदा खान हिने पीडित तरुणीचे ब्रेनवॉश करण्यात मुख्य भूमिका बजावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. डॅनिश आणि तौसीफ अत्तार यांच्या सांगण्यावरून निदाने पीडितेला इस्लामिक धार्मिक व्हिडिओ पाठवले, तिच्या मोबाईलमध्ये ‘मुस्लिम प्रो’ अ‍ॅप डाउनलोड केले आणि तिला नमाज पठण शिकण्यास भाग पाडले. आरोपपत्रानुसार, निदाने पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव टाकला होता. तिने धमकी दिली होती की, “जर तू इस्लाम धर्म स्वीकारला नाहीस, तर अल्लाह तुला आणि तुझ्या कुटुंबाला जहन्नममध्ये (नरकात) पाठवेल.”

जून २०२५ मध्ये पीडितेकडून जबरदस्तीने ‘कलमा’ पठण करून घेण्यात आले. त्यानंतर जून २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात निदा तिला ऑफिस सुटल्यानंतर स्वतःच्या घरी घेऊन जायची. तिथे तिला बुरखा आणि हिजाब घालण्याची सक्ती केली जायची आणि नमाज पडायला लावली जायची. निदाच्या आईलाही या सर्व प्रकाराची माहिती होती आणि ते पीडितेला मदरशामध्ये पाठवण्याची तयारी करत होते, असा धक्कादायक खुलासाही पीडितेने केला आहे.

या प्रकरणातील तिसरा आरोपी तौसीफ याने डॅनिश आणि पीडितेच्या संबंधांचा गैरफायदा घेत, तरुणीला धमकावून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. नाशिक पोलीस सध्या मतीन पटेल यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉईस सॅम्पल (आवाज नमुने) गोळा करत असून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.