नाशिक – टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनीत कामाच्या ठिकाणी महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी दाखल आठ गुन्ह्यांत आठ संशयितांविरुद्ध दोन हजारहून अधिक पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितांमध्ये सहा पुरूष तर दोन महिलांचा समावेश आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
टीसीएसमधील प्राप्त विविध तक्रारींवरून आठ जणांविरोधात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यातील लैंगिक अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणी एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तर उर्वरित आठ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यात रजा रफीक मेमन, शाहरूख हुसेन शौकत कुरेशी, अश्विनी चैनानी, तौसीफ बिलाल अत्तार, शफी भिकन शेख, दानिश इजाज शेख, निदा एजाज खान, आसिफ आलम अन्सारी या संशयितांचा समावेश आहे. आठ गुन्ह्यांतील या संशयितांविरुद्ध येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात मूळ दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रत्येक गुन्ह्याचे स्वतंत्रपणे दोषारोपपत्र आहे. या सर्वाचा विचार करता ते दोन हजारहून अधिक पानांचे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सीसी टीव्ही चित्रण, तांत्रिक व डिजिटल पुरावे, गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू आदींचा समावेश आहे. दाखल गुन्ह्यांच्या तपासात प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले असले तरी या गुन्ह्यांचा तपास सुरूच राहणार आहे. अधिकचे पुरावे प्राप्त करून न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रही दाखल करण्यात येणार आहे. या सर्व गुन्ह्यातील संशयितांचे जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत.
पहिल्या गुन्ह्यात १७ साक्षीदारांचे जबाब
टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणी दाखल पहिल्या गुन्ह्यात दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान आणि मतिन पटेल यांच्याविरुद्ध दीड हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र व विशेष न्यायालयात यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. टीसीएस प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करीत आहे. या गुन्ह्यातील संशयित निदा खानने ४० दिवसांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा दिला होता. छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात १७ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तपासात पीडिता व संशयितांचे भ्रमणध्वनी व्हॉट्स ॲप संभाषणाचे स्क्रिन शॉट आणि फोटो असे तांत्रिक व डिजिटल पुरावे जमा करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, संशयितांच्या बँक खात्याचा तपशील, जातीचे दाखले, गुन्ह्यात वापरलेले वाहन, जप्त मुद्देमालाची ओळख आणि आर्थिक फसवणुकीचे दस्तावेज आदी पुराव्यांचाही समावेश आहे.
