मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता तब्बल सहा हजार १६२ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने घाट बांधणी, जोडरस्ते, रिंगरोड, जलशुद्धीकरण केंद्र, सीसीटीव्ही बसविणे, पूल बांधणी, पावसाळी गटाराची कामे, विद्युत वाहिन्या, ऑप्टिकल फायबर पाईप टाकणे, वाढीव पाणीपुरवठा आदी ६८ प्रकारची कामे मार्गी लावली जाणार आहेत.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकवरील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, विद्युत पुरवठा, सुरक्षा व्यवस्था आदी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण येणार आहे. त्याकरिता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून कुंभमेळ्याकरिता दोन टप्प्यांमध्ये ६८ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले होते. यात वाहतुकीच्या नियोजनाकरिता रेल्वे, महामार्गाला जोडणारे रस्ते प्रामुख्याने बांधले जाणार आहेत. याशिवाय गोदावरीच्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्याकरिता अनेक ठिकाणी वाहनतळ उभारली जाणार आहेत. या वाहनतळांना प्रमुख ठिकाणांशी जोडणारे रस्ते विकसित केले जातील.
घाट बांधणी आणि दुरूस्तीकरिताही मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याकरिता व जलशुद्धीकरणाकरिता सुमारे ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर सुरक्षेकरिता सर्वत्र बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेकरिता सुमारे ३७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिकमधील ओझर विमानतळ विकासाकरिता ५७२ कोटी खर्चण्यात येणार आहेत. तर त्र्यंबकेश्वर परिसरातील पाणीसाठे पूर्णपणे भरण्याकरिता आणि गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहण्याकरिता गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेकरिता सुमारे ३२९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बहुतांश कामे नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
