नसरापूर या ठिकाणी एका चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. ज्यानंतर प्रचंड असा जनक्षोभ पुण्यातल्या नवले पुलावर पाहण्यास मिळाला. शुक्रवारी १ मे रोजी ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन ६५ वर्षीय इसमाने तिची हत्या केली. या प्रकरणात या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातला आरोपी हा नीच आणि विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. सरकारने या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसंच पीडितेला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी चार वर्षांच्या मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. त्यानंतर तिला दगडाने ठेचून ठार मारलं. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. नसरापूर भागातील ग्रामस्थांनी नवले पुलावर आंदोलन केलं. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांची बाजू ऐकून घेत, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल हे स्पष्ट केलं होतं. आता या प्रकरणी ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. तसंच त्याने आत्तापर्यंत अनेक महिलांना आणि मुलींना त्रास दिला आहे. प्राण्यांवरही लैंगिक अत्याचार केले आहेत अशी माहिती गावकऱ्यांनी केली आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत ग्रामस्थांनी काय सांगितलं?
नसरापूरमधला हा आरोपी म्हणजे प्रचंड वाईट माणूस आहे. एकटी महिला दिसली की त्याची तो त्यांच्यावर नजरच ठेवून असायचा. कोण घरी एकटं दिसतं आहे आणि तिच्यावर जाऊन मी कधी अत्याचार करेन? असं त्याला वाटायचं अत्यंत विकृत प्रवृत्तीचा हा आरोपी आहे. त्याची ही घाणेरडी वृत्ती संपली नव्हती. त्यानंतर आम्ही या आरोपीची २० वर्षांपूर्वी धिंड काढली आणि गावाच्या बाहेर हाकलून दिलं. त्यानंतर तो आणि त्याची बायको पलिकडे राहू लागले. पण आता या चिमुरडीवर त्याने बलात्कार केला आणि तिची हत्या केली असं एका महिलेने सांगितलं. LS मराठी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने संताप व्यक्त केला आहे.

नराधम आरोपीला त्याच्या बायकोने वारंवार पाठिशी घातलंय-ग्रामस्थांचा आरोप
या महिलेने पुढे सांगितलं की या नराधमाला सात मुली आहेत. त्यांच्यावरही त्याने अत्याचार केले आहेत, त्यांचाही विनयभंग केला आहे. पण त्याच्या बायकोने त्याला कायमच पाठिशी घातलं आहे. त्याच्या गुन्ह्यांवर पांघरुण घातलं गेलं त्यामुळे तो या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळालं असं या महिलेने सांगितलं. त्यानंतर एका गावकऱ्याने या आऱोपीबाबत सांगितलं की २०१५ मध्ये या नराधमाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. एका छोट्या मुलीवर त्याने अत्याचार केले होते. एक ते दोन वर्षे तो तुरुंगात होता. पण त्याच्या बायकोने त्याला जामिनावर बाहेर काढला. हा असे गंभीर गुन्हे करणार आणि त्याची बायको त्याला तुरुंगाबाहेर काढणार असेल तर ती पण आरोपीच आहे. या प्रकरणात तिलाही शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी एका गावकऱ्याने केली.

वृद्धेवरही केला बलात्कार, त्याला वेळीच शिक्षा झाली असती तर चिमुरडी जिवंत असती
गावातल्या एक वृद्ध स्त्री भांडी घासण्यासाठी बाहेर गेली होती तेव्हा हा नराधम आरोपी तिच्या घरात जाऊन लपला. मध्यरात्री सगळे झोपले होते तेव्हा कोयत्याचा धाक दाखवून त्या वृद्ध महिलेवरही या नराधमाने अत्याचार केले. त्या वृद्ध महिलेने लाजेखातर गाव सोडलं होतं आणि लेकीकडे गेली होती. तिच्यावर वार केले होते, पोलीस तिथे आले होते, पण तोपर्यंत हा नराधम फरार झाला होता. काही वर्षांपूर्वी अशीही घटना घडली होती असं एका गावकऱ्याने सांगितलं. या प्रकरणात या ग्रामस्थाने साक्षही दिली होती. गावात जी घटना घडली ते पाहून आम्हाला खूप दुःख झालं आहे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे असंही या गावकऱ्याने म्हटलं आहे. दुसऱ्या गावकऱ्याने माहिती दिली की या आरोपीने वृद्ध महिलेवर बलात्कार केला होता. त्या आजींचं आता निधन झालं आहे. त्याने त्या आजींवर २२ वार केले होते. तिच्या घरात तो लपला होता आणि त्याने कोयत्याच्या धाकाने त्याने बलात्कार केला होता. ही अत्यंत दुःखद घटना घडली होती. त्या आजींना न्याय मिळाला नाही. त्या माणसाला शिक्षा मिळाली नाही त्यामुळे त्याने या चिमुरडीवर बलात्कार केला. त्याने त्याच्या सख्ख्या पुतणीवरही बलात्कार केला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता पण त्याला त्याच्या बायकोने जामीन मिळवून दिला. त्याला त्याच प्रकरणात किंवा आजींच्या प्रकरणात शिक्षा झाली असती तर ज्या चिमुरडीचा बळी गेला तो आज गेला नसता.
आरोपीकडून प्राण्यांवरही लैंगिक अत्याचार
प्राण्यांवरही त्या आरोपीने लैंगिक अत्याचार केले आहेत. त्याला फाशीची शिक्षा दिली जावी. त्या चिमुरडीला ज्या वेदना झाल्या तशाच वेदना त्याला देऊन सरकारने शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे. त्या नराधमाला कठोर शिक्षा दिली जावी आणि चिमुरडीला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे असंही गावकरी म्हणाले आहेत.
