Nasrapur Case CCTV footage records crucial evidence during power outage: नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. नराधमाला या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांना अनेक सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवावे लागले. या संपूर्ण तपासात एका मिठाईच्या दुकानावरील सीसीटीव्ही फुटेज सर्वांत महत्त्वाचा पैलू ठरला. घटनेच्या दिवशी गावात वीज खंडित झाल्याने ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते; मात्र तरीही एका दुकानातील सीसीटीव्हीमुळे पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं. या संपूर्ण धक्कादायक घटनाक्रमाबाबत पीडितेच्या वडिलांनी आता सविस्तर माहिती दिली आहे.
नसरापूर प्रकरणात नराधमाची पूर्वतयारी आणि ‘रेकी’
पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या मामाच्या गावी, म्हणजेच नसरापूर येथे राहायला गेली होती. तिथे आरोपी भीमराव कांबळे एका मंदिराच्या बांधकामासाठी विटा वाहण्याचं काम करायचा. तिथेच त्याने या निष्पाप मुलीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. याबाबत ‘पोस्टमन ऑफिशियल’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पीडितेच्या वडिलांनी सांगितलं, “भीमराव कांबळेने आधी मुलीची रेकी केली होती, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. दोन दिवस आधीपासून तो तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. ती कधी बाहेर येते? कुठे जाते? कोणासोबत जाते? यावर त्याचा डोळा होता. नसरापूरमधील शेजारच्या घरात ती जेव्हा खेळायला जायची, तेव्हा तो तिथे वाकून तिच्यावर नजर ठेवायचा. पोलीस फक्त घटनेच्या दिवशीचेच नाही, तर दोन-तीन दिवस आधीचेही फुटेज तपासतात. त्यावरून तो माणूस तिथे कसा वावरत होता आणि त्याचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, हे तपासात समोर आलं.”
वीज खंडित झाली अन् घेतला गैरफायदा
“नसरापूर हे ग्रामीण भागात असल्याने तिथे वीज खंडित होण्याची समस्या आहे. घटनेच्या दिवशी नेमकी वीज गेली होती आणि याची आरोपीला पूर्ण कल्पना होती. याच गोष्टीचा फायदा उठवत डाव साधला. घटनेच्या आदल्या दिवशी गोठ्यात एका गायीने वासराला जन्म दिला होता. आजीने पीडितेला ते वासरू दाखवले होते, त्यामुळे लहानग्या मुलीला ते वासरू पाहण्याची ओढ लागली होती. ती सतत तिथे जाण्यासाठी आजीकडे हट्ट करत होती. घटनेच्या दिवशी, दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी ती घराबाहेर आली. आरोपी तिथेच बसला होता. तो तिला म्हणाला, ‘चल, तुला वासरू दाखवतो.’ त्या निष्पाप मुलीने त्याला आजोबा मानलं आणि ती विश्वासाने त्याच्यासोबत गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ती आनंदाने उड्या मारत त्याच्यासोबत जाताना दिसत आहे”, असा हृदयद्रावक घटनाक्रम तिच्या वडिलांनी सांगितला.
मिठाईच्या दुकानातील सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार सापडला
गावात वीज नसताना हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कसा झाला? असा प्रश्न निर्माण होतो. यावर स्पष्टीकरण देताना वडिलांनी सांगितलं की, “वीज नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे कॅमेरे पूर्णपणे बंद होते. परंतु, योगायोगाने एक चमत्कारच घडला. शेजारीच एका स्वीट होमचे (मिठाईचे) दुकान होते. त्यांना अचानक जिलेबीची एक ऑर्डर आली, त्यामुळे त्यांनी आपल्या दुकानातील इन्व्हर्टर चालू केला. इन्व्हर्टर सुरू झाल्यामुळे दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेराही सुरू झाला आणि नेमका याच वेळेत हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा सीसीटीव्ही पुरावा मिळाला नसता, तर आरोपीला पकडणं अत्यंत कठीण झालं असतं”, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं.
“अंधार पडल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावून गावातून पळून जाण्याचा आरोपीचा डाव होता”, असंही वडिलांनी नमूद केलं. “दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी आजीच्या लक्षात आलं की मुलगी कुठेच दिसत नाहीय. तिने सर्वत्र चौकशी केली, पण चिमुकली सापडली नाही. अखेर एका शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि ग्रामस्थांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा भीमराव कांबळे मुलीला गोठ्याच्या बाजूला घेऊन जाताना स्पष्ट दिसला. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे पोलीस आणि गावकरी मुलीचा शोध घेत असताना, दुसरीकडे आरोपी भीमराव कांबळेही गावकऱ्यांसोबत राहून मुलगी शोधण्याचं नाटक करत होता”, असंही त्यांनी सांगितलं.
