पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नसरापूरच्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिक करत आहेत.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पूलावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. मात्र, आंदोलनामुळे प्रचंड वाहतू कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर केला नसल्याचं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्तांनी दिलं. दरम्यान, यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट शेअर करत पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर टीका करत नसरापूरच्या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं?

“पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर ‘आम्ही लाठीचार्ज केलाच नाही’ असं धादांत खोटं बोलत आहेत. पण पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचे भयानक वास्तव या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, त्यानंतर पीडित कुटूंबाला न्याय मिळावा यासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या जनतेवर पोलिसांनी क्रूरपणे लाठ्या चालवल्या, ते पाहून माणुसकीलाही लाज वाटेल”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

“हे राज्य आहे की हुकूमशाही? न्याय मागण्यासाठी जमलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावून, सामान्य नागरिकांवर हात उचलताना, लाठ्या चालवताना पोलिसांचे हात थरथरले नाहीत? वरून निर्लज्जपणे आपली बाजू मांडणारी ही यंत्रणा कुणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे? जनतेचा आक्रोश आणि त्यांच्या तळतळाटाचा शाप या अन्यायी सरकारला नक्कीच भोगावा लागेल. फेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात असू द्यावं, न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, पोलीस यंत्रणेमार्फत न्याय मागणाऱ्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे त्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभा देत नाही”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं?

“आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच शल्य आहे, ‘अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?’ नरसापूरमध्ये बलात्कार पीडित बालिकेच्या वडिलांची कॉलर खेचली जाते. न्याय मागणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज केला जातो? व्वा रे महायुती सरकार…बलात्कारी पेक्षा न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकांचा त्रास होतोय का तुम्हाला? त्यांना पोलीसी खाक्या दाखवण्यात मर्दुमकी वाटते का? देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका. नरसापूरच्या लेकीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या माता-भगिनींवर लाठीचार्ज केला जातोय, काल अशीच अमानवी मारहाण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केली. पाशवी बहुमत मिळाले आहे, म्हणून हुकूमशाही पद्धतीने हे सरकार सामान्य जनतेला तुडवत आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

“या आरोपीने आधीही दोन महिलांवर अत्याचार केले, तुरुंगाची शिक्षा मिळाली तरी हा आरोपी मोकाट बाहेर फिरतोय आणि आज पुन्हा एक लेक बळी पडली. अशी व्यवस्था असेल तर मुलींना, महिलांना सुरक्षित कसे वाटेल? आणि वरून सरकारच पीडितांविरोधात पोलीस बळाचा वापर करत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? लहान मुलींवर अत्याचार वाढत आहे, पोलिसांवरील विश्वास कमी होत आहे म्हणूनच लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे, पण त्यांच्या वेदना समजून न घेता त्यांनाच मारता? हा कोणता न्याय देवाभाऊ?”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटलं?

“पुण्यातील चाकण परिसरात ३ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्यात अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसून पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांना धाकच राहिलेला दिसत नाही. गुन्हेगारांना धाक का राहिलेला नाही याचा राज्यकर्ते, सर्वच राजकीय पक्ष आणि जनतेनं देखील विचार केला पाहिजे. सरकार अजून किती दिवस धृतराष्ट्राचे सोंग घेऊन वाढत्या गुन्हेगारीकडं दुर्लक्ष करणार आहे. त्यामुळे आता सरकारने तत्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलवून शक्ती कायदा पारित करावा..शक्ती कायदा अंमलात आणण्याची हीच ती योग्य वेळ आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नसरापूरचं प्रकरण नेमकं काय आहे?

भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी चार वर्षांच्या मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. नसरापूर भागातील ग्रामस्थांनी पुण्यातील नवले पुलावर आंदोलनही केलं. या घटनेचा निषेध नोंदवत नसरापूर ग्रामस्थांनी नसरापूर बंद ठेवलं होतं. तसंच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.