Nasrapur Case : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी फाशीची शिक्षा सुनावली. राज्याच्या न्यायालयीन इतिहासात अवघ्या दोन महिन्यांत सुनावणी होऊन निकाली लागणारा हा पहिलाच खटला ठरला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने अत्यंत संयम राखून आपला कायदेशीर लढा सुरू ठेवला होता. परंतु, आपल्या पोटच्या चिमुरडीला गमावलेल्या या कुटुंबाच्या मनात सध्या नेमक्या काय भावना आहेत, हे आता समोर आलं आहे. पीडितेच्या वडिलांनी एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

“तीन महिन्यांत तिची खूप आठवण आली”

१ मे रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर गेल्या तीन महिन्यांत त्या कुटुंबातील सदस्यांचं आयुष्य कसं बदललं आणि मुलीच्या विरहातून त्यांनी स्वतःला कसं सावरलं, याबाबत बोलताना पीडितेचे वडील म्हणाले, “मुलीला न्याय मिळवून द्यायचा अशी तिच्या आईची पहिल्यापासून भूमिका होती. आपण दोघांनी एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहायला हवं, असंही तिने मला सांगितलं. पण, गेल्या तीन महिन्यांत आम्हाला तिची खूप आठवण येत होती.” पीडितेच्या वडिलांनी ‘पोस्टमन ऑफिशिअल’ या चॅनेलवर मुलाखत दिली आहे.

“तिच्या वस्तूंमुळे तिची सतत आठवण येते”

“तिच्या बाहुल्या, तिने घरातील भिंतींवर काढलेली चित्रे, तिचे फ्रॉक… या सगळ्या गोष्टी सतत तिची आठवण करून देत होत्या. माझ्यापेक्षा तिच्या आईला हे फार कठीण गेलं. अजूनही कठीण जातंय. आम्ही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला दुसरी मुलगी आहे, आता तिचाच विचार करून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं पीडितेचे वडील म्हणाले.

“ती देवबाप्पाकडे गेली आहे”

पीडित मुलीला सहा वर्षांची एक मोठी बहीणही आहे. तिच्यासाठीही ही घटना अत्यंत धक्कादायक ठरली आहे. आपल्यासोबत रोज खेळणारी लहान बहीण आता आजूबाजूला का दिसत नाही? या विचाराने तिलाही अनेक प्रश्न पडले होते. याविषयी बोलताना वडिलांनी सांगितलं, “तिला तिच्या बुद्धीप्रमाणे कळलंय की तिची बहीण देवबाप्पाकडे गेली आहे. पण तिने बहिणीसोबत काय झालंय? याबाबत विचारलेलं नाही. ती जेव्हा मला विचारते की तिची लहान बहीण कुठे गेली? तेव्हा मी तिला सांगतो की ती गणपती बाप्पाकडे गेली असून तिथे त्यांच्यासोबत खेळत असेल.”

मोठी बहीण खूप रडली

आपल्या भावना दाटून आलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, “एकदा मी असंच गॅलरीत बसून होतो, तेव्हा ती (पीडितेची बहीण) आली. तिचा चेहरा पूर्णपणे कोमेजला होता. मी तिला विचारले की काय झाले? नाराज आहेस का? तुझ्या मनात काय चाललंय? तर ती म्हणाली, ‘बाबा, मला तिची फार आठवण येतेय. ती कुठे आहे सांग ना!’ मी तिला आकाशातील ताऱ्यांकडे बोट दाखवून म्हणालो की, “तो तारा दिसतोय ना ती तिथे आहे. तिथेच ती खेळतेय; तिथे गणपती बाप्पाही आहेत. ते ऐकल्यावर त्या दिवशी ती माझ्यासमोर खूप रडली.”

“घरातील तिच्या वस्तू, तिच्या खेळण्यांकडे पाहिलं की जास्त आठवण येते. ती माझ्यासोबत एक गाणं म्हणायची. ते गाणं असं होतं की…” असं म्हणताना तिच्या वडिलांचा कंठ दाटून आला. “आईची की बाबाची सांगा कोणाची, मी परी गोडशी माझ्या बाबाची, असं गाणं माझं बाळ म्हणायचं”, असं सांगताना तिच्या वडिलांच्या डोळ्यांत मुलीच्या आठवणीने अश्रू भरून आले होते.