भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून, याप्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नराधम आरोपीने या चिमुरडीला एका गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बालिकेला दगडाने ठेचून ठार केले आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकला. ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन आणि बंद
घटनेचे वृत्त समजताच शुक्रवारी रात्री संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला आणि नसरापूर परिसरात कडकडीत बंद पाळला. संतप्त जमावाने राजगड पोलीस ठाण्यावर धाव घेत आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याची टीका विरोधकांनी केली.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, “अशा राक्षसी प्रकाराचा निषेध करायलाही शब्द नाहीत. राज्यात चार वर्षांची मुलेही सुरक्षित राहिलेली नाहीत. गृहमंत्री स्वतःची जाहिरात करण्यात मश्गूल आहेत, त्यांना सामान्य जनतेच्या सुरक्षेशी देणेघेणे नाही. आम्ही राजीनामा मागणार नाही, कारण त्यांना काही फरकच पडत नाही.”
क्रूर मानसिकतेचा निषेध
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या क्रूर मानसिकतेचा निषेध केला असून, ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळी आपण त्याचे राजकारण करू नये. ज्या व्यक्तीने हे क्रूर कृत्य केले आहे, त्याने काही राजकारण बघून हे कृती केले नाही. ही त्याची क्रूर मानसिकता आहे. अशा घटनेचे जे राजकारण करतात ते दर्शवतात ज्या व्यक्तीने केलेला आहे त्यांच्यावर मात्र कडक शिक्षा नक्कीच होईल. त्या व्यक्तीला शिक्षा देत असताना कायद्यात ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सर्वांचा उपयोग करून शंभर टक्के शिक्षा करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यकीय पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. “ग्रामस्थांच्या भावना रास्त असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलीस अधीक्षक गिल यांनी दिले आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
