मुंबई: नरसापूर येथे चार वर्षांच्या मूलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून विरोधकांनी गृहविभागावर आगपाखड केली आहे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपी करायला हवे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केली तर या प्रकरणात पोलिसांना आरोपीने याआधी गुन्हे केल्याचे माहीत असूनही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात न दिल्याने याची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नरसापूर प्रकरणातील आरोपीने याआधी गुन्हे केले याची माहिती कालपासून उपलब्ध असताना कोर्टात ही माहिती पोलिसांनी दिली नाही? कोर्टाने झापल्यावर पोलिसांनी रिमांड प्रत बदलल. इतका हलगर्जीपणा पोलीस करत असतील तर त्या बालिकेला काय न्याय मिळणार? पीडित कुटुंबीय आणि जनतेवर लाठीचार्ज करणे इतकेच कर्तृत्व पोलिसांचे आहे काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका अतिशय असंवेदनशील आणि हलगर्जीपणाची राहिली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नसल्याने या प्रकरणचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद असून त्यांच्या कार्यकाळात लहान मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. फडणवीस हे २४ तास राजकारणात अडकल्याने त्यांचा गृह विभागावर वचक राहिलेला नाही. फडणवीसांनी मिसिंग लिंकच्या वाहतूककोंडीनंतर माफी मागितली, मात्र त्यांनी नरसापूर प्रकरणात माफी मागितली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रुपये मिळत असतील, मात्र मोबदल्यात त्यांच्या मुलींवर जर अत्याचार होत असतील तिने तोंड बंद करून राहावे का, असा सवाल त्यांनी केला.
पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. वास्तविक पाहता सरकारचा पोलिसांवर व पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिलेला नाही, पोलीस गृहमंत्र्यानाही जुमानत नाहीत हे चित्र आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
ही कोणती विकृती राज्यात पाेसतोय – अमित ठाकरे
नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडले, ते ऐकून मन सुन्न झाले असून डोके रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? असा संतप्त सवाल मनने नेते अमित ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे केला. महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो, अशी टीका त्यांनी केली.
