अलिबाग: नथुराम पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अलिबाग पोलिसांना यश आले आहे. पैशाच्या वादातून दोन नातेवाईकांनीच पवार यांची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युनियन बँक ऑफ इंडीया अलिबाग शाखेत शिपाई पदावर काम करणाऱ्या नथुराम रुपसिंग पवार याची निघृण हत्या करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील सहाण पाले बायपास येथे त्याचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश अलिबाग पोलिसांना दिले होते.

आणखी वाचा- “७२ तास चकवा दिल्यानंतर कशी झाली अनिल जयसिंघानीला अटक?” मुंबई पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

त्यानुसार गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आली होती. एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता. नथुराम पवार यांच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांकडे चौकशी सुरू होती. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपासण्यात आली होती. या तपासा दरम्यान नथुराम पवार याचे नातेवाईक असलेले निलेश पवार आणि साहिल राठोड हे दोघे त्याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. मात्र पोलीस तपासाचा सुगावा लागताच हे दोघे फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. दोघांच्या शोध घेण्यासाठी पथक पुणे, सोलापूर, कर्नाटक येथे पाठविण्यात आली होती. त्यातील निलेश पवार यास पोलिसांनी सोलापूर येथून ताब्यात घेतले तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

मयत नथुराम याने निलेश याच्याकडून युनियन बँकेत नोकरी लावतो सांगून एक लाख रुपये घेतले होते. बँकेत साफसफाईचे कामही तो करून घेत होता पण नोकरीला लावले नाही या रागातूनच नथुराण्याची हत्या करण्यात आल्याच पोलीस तपासात समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान निलेश पवार यास न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक शैलेश सणस, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सुनील फड, आणि अनिकेत म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

घटनाक्रम…

नथुराम पवार हे १३ मार्च पासून बेपत्ता होते. बँकेत कामावर गेलेले नथुराम घरी परतले नसल्याने त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची फिर्याद अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. ब्राम्हण आळीतील चहा टपरी जवळ त्यांची गाडी पार्क केली असल्याचे आढळून आले होते. तर मंगळवारी सहाणपाले बायपास येथे शेतात त्यांच्या मृतदेह आढळून आला होता. तिक्ष्ण हत्याराने अनेक वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले होते

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nathuram pawar killed due to financial controversy alibaug police solve case mrj
First published on: 20-03-2023 at 18:01 IST