सावंतवाडी : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कामगिरीची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्याच्या वतीने ‘निवती रॉक’ या निर्मनुष्य बेटावर २०२५ मध्ये करण्यात आलेल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा समावेश केंद्र सरकारच्या विशेष ‘कॉफी टेबल बुक’मध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले असून, यामुळे निवती पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या पोलीस महासंचालकांच्या (DGSP) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतातील सर्व बेटांवर तिरंगा फडकवण्याचे निर्देश दिले होते. भारताच्या सार्वभौमत्वाची आणि एकतेची भावना दृढ करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘सीमा व्यवस्थापन’ विभागाच्या माध्यमातून सर्व किनारी राज्यांशी समन्वय साधून ही मोहीम राबवली.
निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘निवती रॉक’ हे एक निर्मनुष्य आणि खडकाळ बेट आहे. समुद्राचे वादळी पाणी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे येथे पोहोचणे मोठे आव्हान होते. मात्र, भारतीय नौदल, तटरक्षक दल, वन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने निवती पोलीस पथकाने हे आव्हान पेलले. प्रजासत्ताक दिनी या बेटावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. या मोहिमेचे चित्रीकरण आणि ड्रोन फोटोग्राफी करण्यात आली होती.
कॉफी टेबल बुकमध्ये स्थान:
राजभाषा विभागाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने हे विशेष ‘कॉफी टेबल बुक’ तयार केले आहे. यात देशातील एकूण १,३८९ बेटांपैकी १०९७ बेटांवर झालेल्या ध्वजारोहणाचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. यामध्ये निवती रॉक येथील ध्वजारोहणाची चित्रे आणि माहिती यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हे पुस्तक केवळ माहितीचे साधन नसून ते भारतीय किनारपट्टीच्या वैविध्यपूर्ण लँडस्केपचे आणि पोलिसांच्या समर्पणाचे प्रतीक ठरले आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरही नोंद
या मोहिमेचे सर्व फोटो आणि व्हिडिओ ‘BISAG-N’ ने विकसित केलेल्या ‘किनारी डिजिटल मॅपिंग प्लॅटफॉर्म’वर अपलोड करण्यात आले आहेत. निवती रॉक येथील या मोहिमेत स्थानिक प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
