पवारांनी कान टोचले, सर्व स्थानिक नेत्यांना एकदिलाने राहण्याच्या सूचना

आसाराम लोमटे, लोकसत्ता

Sunetra Pawar Wealth vs Supriya Sule Wealth Marathi News
Supriya Sule Wealth : सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय ३५ लाखांचं कर्ज, पार्थ पवारांच्याही ऋणी! निवडणूक प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा खुलासा
ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

परभणी : जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षांतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी थेट पक्षनेतृत्वाने कान टोचले असून काही दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व स्थानिक नेत्यांना एकदिलाने राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याने शरद पवार यांनीच लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खासदार श्रीमती फौजिया खान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय गव्हाणे, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, भरत घनदाट आदी उपस्थित होते.

आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातला अंतर्गत कलह समोर आला होता. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचे वारंवार दिसून येत होते, बाबाजानी यांच्या राजीनाम्याने तो चव्हाटय़ावर आला होता. कालांतराने बाबाजानी यांच्या राजीनाम्यावर पडदा पडला. माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खासदार श्रीमती फौजिया खान यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद शमविण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच पुढाकार घेत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना एकत्र आणले. श्रीमती खान यांच्याकडे या संदर्भातील प्राथमिक बैठक झाली. १५ दिवसांपूर्वी हे सर्व नेते एकत्र आल्याचे छायाचित्र झळकले होते आणि आता दिल्लीत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांनी या सर्व स्थानिक नेत्यांना एका माळेत ओवण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतेही किंतु- परंतु जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये शिल्लक राहू नयेत यासाठी पवारांनी तब्बल दोन तास या सर्वाना एकीचा कानमंत्र दिला आहे. पवारांचा हा कानमंत्र कितपत यशस्वी होतो हे नजीकच्या काळात दिसणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील हे सर्व नेते खरोखरच एकत्र राहतात की पुन्हा एकमेकांच्या पायात पाय घालतात हे काही काळानंतर स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सातत्याने येणारे अपयश याबाबत पक्षाध्यक्ष पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची निर्णायक ताकद असतानाही अपेक्षित परिणाम हाती येत नाहीत याबद्दल त्यांनी या सर्व स्थानिक नेत्यांकडे असमाधान व्यक्त केल्याचे समजते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्परांत कोणतेही मतभेद राहता कामा नयेत, असे बजावताना या सर्व नेत्यांची मते पवारांनी जाणून घेतली व परस्परांविषयी असलेल्या मतभेदाचे मुद्देही मोकळेपणाने सांगून टाका, असे सांगितले. त्यानुसार या सर्व स्थानिक नेत्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक घटना घडामोडी लक्षात घेता राष्ट्रवादीत सारेच आलबेल नसल्याचे दिसून येत होते. एक वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा संचालकपदाच्या निवडीनंतर अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी सुरू झाली. त्या वेळी बाबाजानी यांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशी संधान साधले. राष्ट्रवादीच्या संचालकांनी महाविकास आघाडीसोबत जावे, असा पक्षादेश असताना बाबाजानी यांनी या आदेशाला छेद देणारी भूमिका घेतली. या घटनेपासून बाबाजानी विरुद्ध राजेश विटेकर हा अंतर्गत संघर्ष राष्ट्रवादीत सुरू झाला. तोवर बाबाजानी यांच्या प्रभावाखाली असलेल्या विटेकर यांनी हळूहळू पक्षात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला प्रारंभ केला.

त्याच वेळी सोनपेठ येथील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या एका इमारतीसंदर्भात बाबाजानी यांनी तक्रार दिली. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना बाबाजानी यांनी ही तक्रार दिलीच कशी याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त झाले होते. त्यानंतर बाबाजानी व विटेकर यांचे मतभेद आणखीच वाढले. परभणी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक मोठा गट बाबाजानी यांच्या विरोधात गेला होता. पक्षांतर्गत गटबाजीमुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद असूनही त्याचा परिणाम दिसून येत नव्हता. परिणामी परभणी महापालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीतील सूत्रे देशमुख यांच्या हाती असतील, असे संकेत पक्षनेतृत्वाने दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वी बाबाजानी यांनी पक्षाकडे आपला राजीनामा दिला होता. हळूहळू त्यावर पडदाही पडला आणि बाबाजानी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत सक्रिय झाले. पक्षनेतृत्वाविषयी नाराज असलेल्या बाबाजानी यांना राष्ट्रवादीत थोपवून धरण्याची जबाबदारी खासदार श्रीमती फौजिया खान आणि माजी आमदार विजय गव्हाणे यांनी पार पाडली. श्रीमती खान यांनी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना एकत्र आणले. त्यांच्या पुढाकारानेच दिल्लीत पक्षाध्यक्ष पवार यांच्यासमवेत या सर्व नेत्यांची बैठक घडवून आणली. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुका आहेत. अशा वेळी पक्षात बेदिली असणे बरे नाही याचा विचार पक्षनेतृत्वाने केला असावा. पक्षनेतृत्वाने योग्य ती समज दिल्यानंतर खरोखरच अंतर्गत कलह मिटतील काय, हा मात्र कळीचा प्रश्न आहे.

आगामी काळात महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने नेत्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाच्या असतात. कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून या निवडणुकांना खूप महत्त्व आहे. सर्व नेत्यांनी एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यात नक्कीच या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल स्थान प्राप्त करील. दिल्लीतील बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात आम्ही मजबूत पक्षबांधणी करू, असा विश्वास नेतृत्वाला दिला आहे.

प्रताप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, परभणी