राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे” चे आयोजन करण्यात आले आहे. ‘संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

“गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून २८ जानेवारी रोजी या दौर्‍याची सुरुवात होणार आहे. सलग १७ दिवस विदर्भ, खानदेशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा संवाद यात्रेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. या दौऱ्यात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या १४ जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील व पक्ष वाढवण्यासाठी रणनिती आखली जाईल.” असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

या यात्रेत जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल पटेल, अनिल देशमुख, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह युवक – युवती, विद्यार्थी व पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिली आहे.