निसर्गाकडून पावसाचे संकेत

जंगलातील वृक्ष हे केवळ सावली देत नाहीत तर ते निसर्गातील बदलांची चाहूलही देतात.

निसर्गाने यंदा पाऊस लवकर येण्याचे संकेत दिले आहेत.

हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत अद्याप कोणताही ठोस अंदाज वर्तवला नसला तरी कोकणातील निसर्गाने यंदा पाऊस लवकर येण्याचे संकेत दिले आहेत. निसर्गाचा शॉवर इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहावा वृक्ष यंदा नेहमीपेक्षा लवकर फुलला आहे. त्यामुळे चांगल्या आणि भरपूर पावसाचे वेध शेतकऱ्यांना लागले आहेत.
जंगलातील वृक्ष हे केवळ सावली देत नाहीत तर ते निसर्गातील बदलांची चाहूलही देतात. बहावादेखील त्यापकी एक. म्हणूनच त्याला निसर्गाचा शॉवर इंडिकेटर असेही संबोधले जाते. हा वृक्ष फुलल्यानंतर साधारण ३० ते ३५ दिवसांनी पाउस पडतो असा समज कोकणात आहे. दरवर्षी एप्रिलच्या उत्तरार्धात फुलणारा हा बहावा यंदा मार्च महिन्याच्या उत्तरार्धात फुललेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर होईल असा अंदाज बांधला जात आहे. परिणामी शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. यंदा शेतीची मान्सूनपूर्व कामे लवकर आटोपावी लागतील, असे वरसोली येथील शेतकरी सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.
पिवळ्याधमक फुलांनी डवरलेला बहावा मनाला आणि डोळ्याला आनंद देतो. त्याचे औषधी गुणधर्मही खूप आहेत. जपानमध्ये झालेल्या एका परिषदेत बहाव्याचे महत्त्वही विशद करण्यात आले. मनुष्याचे ८० टक्के आजार बहावामुळे दूर होतात, असे या परिषदेत मांडण्यात आले. एखाद्या वृक्षाला फुले येणे हे त्याला मिळणारा प्रकाश आणि तापमान यावरही अवलंबून असते, असे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले.
गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्य सध्या दुष्काळाच्या सावटाखाली होरपळून निघाले आहे. शेती करपून गेली आहे. नद्या-नाले आटले आहेत, हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा धुंडाळण्याची वेळ राज्यातील नागरिकांवर ओढवली आहे. तळपत्या सूर्यतेजाने मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही आटले असल्याचे दाहक चित्र अनुभवायला मिळते आहे. त्यामुळे या वर्षी तरी चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा सर्वानाच आहे. हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाबाबात अद्याप ठोस अंदाज व्यक्त केलेला नाही. मात्र निसर्गाच्या शॉवर इंडिकेटरने दिलेले हे संकेत शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहेत.
वैज्ञानिकदृष्टय़ा बहाव्याचे फुलणे आणि पावसाचे आगमन यातील संबंध कदाचित नसेलही. पण होरपळणाऱ्या उन्हात पावसाची चाहूल ही कल्पनाच अनेकांसाठी दिलासा देणारी असेल हे मात्र नक्की..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nature signal of rain