पुणे : राज्यात घरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात वर्षांत घरांच्या किमतीत मुंबईत ६४ टक्के तर पुण्यात ५१ टक्के वाढ झाली आहे. राज्यात नवी मुंबईत घरांच्या किमतीत सर्वाधिक ७१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याचवेळी ठाण्यात ही वाढ ६३ टक्के झालेली आहे. तसेच घरांच्या भाडे उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना चांगला परतावा मिळत आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात देशातील ११ गृहनिर्माण बाजारपेठांचा २०१९ ते २०२६ या कालावधीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या बाजारपेठांमध्ये राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे या चार बाजारपेठांचा समावेश आहे. या ठिकाणी गेल्या सात वर्षांत घरांच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. नवी मुंबईत ही वाढ सर्वाधिक ७१ टक्के असून, त्याखालोखाल मुंबई ६४ टक्के, ठाणे ६३ टक्के आणि पुणे ५१ टक्के अशी वाढ नोंदविण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत महानगरांमध्ये पायाभूत सुविधा विस्तारामुळे कंपन्यांकडून गुंतवणूक केली जात आहे. त्यातच जागतिक क्षमता केंद्रांची (जीसीसी) संख्या वाढू लागल्याने महानगरांमध्ये स्थलांतराचा ओघ कायम आहे. यामुळे भाड्याच्या घरांना मागणी कायम असल्याने भाडे उत्पन्नातही सातत्यपूर्ण वाढ झाली आहे. घराच्या किमतीच्या तुलनेत मिळणाऱ्या वार्षिक भाड्याला भाडे उत्पन्न म्हटले जाते. यामुळे गुंतवणूक म्हणून घर घेतलेल्या नागरिकांना भाडे उत्पन्नाच्या माध्यमातून चांगला परतावा मिळत आहे. राज्यात भाडे उत्पन्नातील वाढ मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी ०.८० टक्के असून, पुण्यात ०.६५ टक्के आहे.

घरांच्या किमती (प्रतिचौरसफूट रुपयांत)

शहर – २०१९ – २०२६
मुंबई – १७८४५ – २९२७०
ठाणे – ८७८५ – १४३००
नवी मुंबई – ६८६० – ११७२०
पुणे – ५५१० – ८३००

भाडे उत्पन्न (टक्क्यांत)

शहर – २०१९ – २०२६
मुंबई – ३.५ – ४.३
पुणे – ३.३ – ३.९५
नवी मुंबई – २.८ – ३.६
ठाणे – २.७ – ३.५

अनेक वेळा घरांच्या किमतीतील वाढ अधिक असल्याने त्या तुलनेत भाडे वाढत नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत देशात घरांच्या किमतीत वाढ होत असताना भाडे उत्पन्नातही वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे घरांच्या किमती वाढूनही त्यातून मिळणारे भाडे उत्पन्न वाढल्याने ग्राहकांना फायदा होत आहे. घर खरेदी करण्यातील गुंतवणुकीवर आता वाढत्या किमतीसोबत वाढणाऱ्या भाडे उत्पन्नाचा परतावाही ग्राहकांना मिळत आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप