Navi Mumbai Municipal Election News : राज्यातील सत्ताधारी महायुतीने आगामी महापालिकेच्या निवडणुका युतीत लढविण्याची घोषणा केली असली तरी नवी मुंबईत मात्र शिंदे गटाने स्वबळावर लढण्याचे ठोस संकेत दिले आहे. नवी मुंबईत भाजपाशी युती न झाल्यास शिवसेनेची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही पक्षातील युतीच्या चर्चांमध्ये पुन्हा मिठाचा खडा पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्याची घोषणा केली होती.
नवी मुंबई महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या १११ इतकी आहे. त्यापैकी ६० नगरसेवक हे भाजपाकडे असून ५० ते ५२ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ५० टक्के जागांची मागणी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रस्तावावरच खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांची शनिवारी भेट घेतल्याची चर्चा होती. या भेटीत जागावाटपावरून ठोस तोडगा निघाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपाचे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-भाजपाची युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एपीबी माझाशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. प्रत्येकाला असे वाटते की मला पक्षाकडून संधी मिळायला हवी. परंतु पक्षाची भूमिका आणि तत्वांची अंमलबजावणी करावी लागते, असे म्हस्के यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाशी युतीची चर्चा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर नाहीच झाल्यास तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ. आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांचीही तशीच भूमिका आहे, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. सीबीडी बेलापूर, ऐरोली आणि इतर भागातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते सध्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आमच्याकडे जवळजवळ ५५ हून अधिक माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर नक्कीच भगवा फडकणार, असा विश्वासही नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबईत गणेश नाईकांचे वर्चस्व
नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक कुटुंबाची एकहाती सत्ता राहिलेली आहे. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. ते कोणत्या ही पक्षात असले तरी त्याचा काही एक परिणाम सत्ताकरणावर होत नाही. मात्र, यावेळी त्यांच्या या साम्राज्याला तडा देण्यासाठी एकनाथ शिंदे सरसावले आहेत. नवी मुंबईतील शिंदेचे शिलेदार ही नाईक यांना कडवा विरोध करत आहेत. त्यामुळे इथे युती होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जरी युती झाली तरी शिंदे गटाला अपेक्षेप्रमाणे जागा मिळणार नाहीत. शिवाय त्यांना गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे युती पेक्षा स्वबळावरच निवडणूक लढवणे बरे असा सूर शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा आहे…. या बातमीसाठी हेडिंग यूआरएल आणि कीवर्ड हवे आहे.
