Maharashtra election analysis : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे वादळ संपूर्ण राज्यभर घोंगावले. या वादळाचा तडाखा कमी-अधिक प्रमाणात राज्यातील विविध भागांमधील मातब्बर नेत्यांनाही बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात झगडताना दिसले, तर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या तगड्या नेत्याला त्यांच्या जिल्ह्यातच भाजपबरोबर झुंज द्यावी लागली. राज्यभर वेगवेगळी राजकीय समीकरणे उदयास येत असताना मुंबईनजीकच्या शहरांत गणेश नाईक, हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी या तीन मुरलेल्या राजकीय कुटुंबांनी आपापल्या शहरांवर राखलेले वर्चस्व मात्र लक्षवेधी ठरले आहे.
नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात गणेश नाईक यांचे गेली साडेतीन दशके एकहाती वर्चस्व राहिले आहे. नाईक ज्या पक्षात, त्या पक्षाची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता असेच समीकरण या काळात राहिले आहे. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यानंतर नाईक आणि नवी मुंबईची सत्ता हे समीकरण उलथविण्याचा पूर्ण प्रयत्न तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी एकसंघ शिवसेनेच्या माध्यमातून करून पाहिला. नाईक तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. भाजप आणि शिवसेना एकत्र असूनही नाईक यांनी २०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काठावरची सत्ता शहरात आणली होती. पुढे नाईक भाजपमध्ये प्रवेश करते झाले. शरद पवारांची साथ सोडू नये अशी इच्छा असूनही मुलांच्या आग्रहास्तव नाईकांनी भाजपची वाट धरली. ‘वादळ सुटले की आधी झोपडी वाचवा, इमले पुढे बांधता येतात’ या न्यायानुसार नाईकांनी प्रवाहाच्या दिशेने जाणे पसंत केले. कोविड काळानंतर पाच वर्षे खोळंबलेल्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि नाईकांच्या समर्थकांनी पहिल्यांदाच कमळाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली. भाजपचा नवी मुंबईतील मोठा नवमतदार हा यंदा नाईकांसाठी जमेची बाजू होती. तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव मंत्री म्हणून नाईक यांचे वजन वाढले असले, तरी ‘नगरविकास’ विभागाच्या अनेक क्लुप्त्यांमुळे नाईक बेजार होतील अशाच पद्धतीची आखणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. निवडणुकीत महत्त्वाची मानली जाणारी प्रभाग रचना नाईकांसाठी प्रतिकूल ठरेल अशा पद्धतीने तयार केली गेल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला होता. ही रचना अर्थातच शिंदे यांच्या पक्षासाठी अनुकूल मानली जात होती. निवडणुकांचा हंगाम सुरू असताना ठाकरे, पवार, काँग्रेसमधून अनेक मातब्बर नेते शिंदे यांनी आपल्या पक्षात आणले. प्रशासकीय राजवटीत नवी मुंबई महापालिकेवर ठाण्याचा प्रभाव होता. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांची शेकडो कोटी रुपयांची कामे या काळात मंजूर झाली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला गेला. राज्यात भाजपची सत्ता असूनही नाईक नवी मुंबईत विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरताना दिसले. नवी मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवणे ही नाईकांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून नाईक यांनी शिंदे यांच्यावर थेट प्रहार केले. ‘टांगा, घोडे, चोर, दरोडेखोर’ असे शब्द नाईकांच्या भाषणांत वेळोवेळी येत राहिले. स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याविषयी नाईक बेधडक बोलले. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या तगड्या नेत्याला अंगावर घेत असताना पक्षाच्या ‘केडर’मध्ये उत्साह फुंकण्याचे काम त्यांनी पद्धतशीरपणे केले. साम, दाम, दंड, भेद कशातही आपण शिंदेपेक्षा कमी नाही, हे ते वेळोवेळी दाखवत राहिले. अखेरच्या काही दिवसांत शिंदे शहरात फिरतील आणि निवडणुकांचे चित्र पालटतील अशी वंदता होती. नाईक यांनी शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या ताफ्यामागे आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोडले. ‘तुम्ही संसाधनांचा वर्षाव कराल तर मी देखील पाऊस पाडेन’ अशा पद्धतीने नाईक कुठेही कमी पडले नाहीत. भाजपची साथ नाईकांना निर्णायक ठरलीच, मात्र निवडणुकीचे एकखांबी नेतृत्व नाईकांनीच केले, हे त्यांच्या विरोधकांनाही नाकारता येणार नाही.
ईडी, चौकश्या… आणि ठाकूर जिंकले
गेल्या ३५ वर्षांपासून वसई-विरार शहरात एकहाती सत्ता गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय कारकिर्दीला २०२४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठे आव्हान दिले होते. राजकीय कोंडी, नगरसेवकांची फोडाफोडी, ईडीचे छापे, त्यानंतरच्या चौकश्यांचा ससेमिरा वसई-विरार आणि ठाकूरांच्या सत्तेवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लागला होता. विधानसभा निवडणुकांमधील दारुण पराभवाची पार्श्वभूमीही होतीच. असे असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हितेंद्र ठाकूरांनी भाजपशी दिलेली लढत लक्षवेधी ठरली. १९९० च्या दशकापासून वसई, विरार आणि नालासोपारा या मतदारसंघांवर हितेंद्र ठाकूरांची मजबूत पकड राहिली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. तर २००९ साली महापालिकेच्या स्थापनेनंतर पार पडलेल्या २०१० च्या निवडणुकीत बहुमत मिळवत बहुजन विकास आघाडीने पहिल्यांदा महापालिकेत आपली सत्ता स्थापन केली. तर २०१४ साली देशभरात भाजपची लाट पसरली असतानाही २०१५ च्या महापालिका निवडणुकीत ११५ पैकी १०६ जागा जिंकत बविआने मताधिक्य मिळवत वसई-विरार शहरात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत या सत्तेला खिंडार पाडले होते. नालासोपाऱ्यातील उत्तर भारतीय मतदारांचा वाढता प्रभाव आणि नागरीकरणाचे प्रश्न यामुळे राजकीय समीकरणे बदलली होती. महायुतीने वसई, नालासोपारा आणि बोईसर काबीज करून ठाकूरांना त्यांच्या घरातच धक्का दिला होता. विजयाच्या लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकूरांची सर्व बाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली होती. यासाठी बहुजन विकास आघाडीच्या शिलेदारांना फोडून आपल्या गोटात सामील करणे, ठाकूरांच्या पुढाकाराने सुरू झालेली ‘मॅरेथॉन’ स्पर्धा रद्द करणे, रखडलेल्या विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप अशा प्रकारची रणनीती भाजपने आखली होती. तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूरांनीही निवडणुकीपूर्वी मेळावे आणि सभा घेत मोर्चेबांधणी सुरू केली होती. एकेकाळी स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने मित्रपक्षांना सोबत घेतले. माजी महापौर, माजी नगरसेवकांची फौज निवडणुकीच्या रिंगणात उतरवली. तसेच नव्या आणि जुन्या अशा सर्वच कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन पक्षाचा प्रचार केला. ठाकूरांच्या याच संयमी आणि नियोजित राजकीय रणनीतीमुळे बहुजन विकास आघाडीने भाजपला मात देत ७० जागांच्या मताधिक्यासह महापालिकेत तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.
म्हणून कलानी टिकले, इदनानी संपले
उल्हासनगर महापालिका निवडणुकांमध्ये ज्यांच्या गोटात कलानी आणि इदनानी, त्यांचा विजय नक्की असे सूत्र गेल्या काही वर्षांत समोर आले होते. त्यामुळे कलानी आणि इदनानी कधी भाजपासोबत तर कधी शिवसेनेसोबत दिसायचे. गेल्या २० वर्षांच्या काळात कलानींच्या राजकारणातून वेगळे होत इदनानींनी स्वतंत्र चूल मांडली. त्यांनी त्यांचे प्रभाग मजबूत केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांना धक्का दिला. उच्च मध्यमवर्गीय, उच्च वर्गीय मतदार साई पक्षाचा होता; त्याने यंदा भाजपला निवडले. तर कलानींचे मतदार हे तसे झोपडी, बैठ्या घरांमध्ये अधिक आहेत. मागासवर्गीय प्रभागात, पंजाबी, मिश्र वसाहतींमध्ये कलानींना मानणारा मोठा वर्ग आहे. तो वर्ग कधी कलानींपासून दूर गेला नाही. त्यामुळे कलानी या निवडणुकीतही आपल्या प्रभागांमध्ये आपले वर्चस्व टिकवू शकले. उल्हासनगरात कलानी गटाचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात जितके योगदान ओमी कलानी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आहे, तितकेच योगदान पुन्हा राजकारणात सक्रिय झालेल्या पप्पू कलानी यांचेही आहे. जिथे ओमी कलानी यांनी तरुणाईला साद घालत आपल्या संघटनेची बांधणी केली, तशीच पप्पू कलानी यांनीही जुन्या जाणत्यांना आपल्याकडे खेचले. त्यांनी विधानसभेपूर्वीच विविध पक्षांतील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना एकत्र केले. जुने व्यापारी, संस्था, संघटनांचे प्रमुख यांना जवळ केले. भाजपातून सिंधी समाजाचे लोकप्रतिनिधी आपल्याकडे खेचले. वेळोप्रसंगी आपली ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची मदत घेतली. कुटुंबातील प्रतिनिधी म्हणून आपल्या लेकीला, अर्थात सीमा कलानींना, थेट महापौर पदाचे दावेदार असलेल्या आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांच्या प्रभागात रिंगणात उतरवले. त्यामुळे त्यांना मतांचे गणित जुळवता आले.
भाजपने गेल्या दहा वर्षांत निवडणूक विजयाचे जे तंत्र आत्मसात केले त्या तंत्राने राज्यभरातील भल्या भल्या नेत्याना जेरीस आणले. त्या त्या भागावर वर्षानुवर्षे पकड राखून असलेल्या नेत्यांच्या विरोधातील तुल्यबळ व्यक्तीस अमर्याद ताकद देऊन भाजपने तेथे प्रस्थापित उलथवून लावले. जेथे हे शक्य नव्हते तेथे प्रस्थापितानाच साम-दाम-दंड नितीने आपल्या कंपूत आणले. गणेश नाईक यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्यांनी काळाची पावले ओळखून भाजपशी संगत केली. मात्र आपल्या शहरावर नियंत्रण आपलेच राहील अशीच माणसे उभी केली. त्यामुळे पुढील पाच वर्षे नवी मुंबईत सत्ता भाजपची राहणार असली तरी नियंत्रण नाईकांचेच राहणार आहे. वसईत ठाकूर यांना मतदारांनी हात देऊन भाजपला अव्हेरले. मात्र हा कौल पालिकेचा कारभार करताना किती प्रभावी ठरतो, हे येत्या कळत दिसेल. तर कलानी यांनी पुढील पाच वर्षे उल्हासनगरात आपले अस्तित्व कायम राहील, याची तजवीज करून ठेवली आहे.
