अलिबाग –  राज्यातील इतर भागांप्रमाणेच यंदा कोकणावरही दुष्काळाची छाया आहे. येत्या काळात पाणी संकट गंभीर होण्याची चिन्ह दिसत आहेत. पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक गावांवर येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड आणि नवीमुंबईतील पाणी प्रश्न सुटावा यासाठी जिल्ह्यात पाच महत्वाकांक्षी प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र निरनिराळ्या कारणांनी हे प्रकल्प रखडले असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकल्प मार्गी लागले असते तर रायगड सह नवीमुंबईचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला असता,  दुष्काळी परिस्थिती आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सांबरकुंड धरण…

अलिबाग तालुक्यातील अडीच हजार हेक्टर शेती सिंचनाखाली यावी आणि तालुक्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी १९८३ साली या धरणाच्या कामाला मंजूरी मिळाली होती. मात्र चार दशरांनंतरही धरणाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. भूसंपादन अडचणी, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न, वन आणि पर्यावरण विषयक मंजूरी या कारणांसाठी धरणाचे काम रखडत गेले. प्रकल्पाची किमंतही ११ कोटींवरून साडेसातशे कोटींवर गेली आहे. आता त्यात आणखिन वाढ अपेक्षित आहे. आजवर पाच वेळा प्रकल्पाला सुधारित मान्यता देण्यात आल्या आहेत. यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले नाही.

बाळगंगा धरण…

नवी मुबईतील विवीध भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने  २०१० सालीधरणाच्या कामाला सुरवात करण्यात केली होती. २०१३ अखेर पर्यंत धरणाचे काम ८० पुर्ण कामही पुर्ण झाले. मात्र नंतर हे सिंचन घोटाळ्याच्या वादात सापडले. नंतर निरनिराळ्या कारणामुळे हे काम रखडत गेले. धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाबाबत फारशी हालचाल झाली नाही. पेण तालुक्यातील वरसई परिसरातील सहा ग्रामपचांयती मधील ९ गावं १३ वाड्यामधील १ हजार ४०० हेक्टर प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ३ हजार ४४३ कुटुब बाधित होणार असून त्यांचे घर आणि जमीनी संपादीत केल्या जाणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी धरणाचे काम मार्गी लागलेले नाही.

कोंढाणे धरण….

उल्हास नदीवर कोंढाणे चोची परीसरात २०११ साली या धरणाच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आली होती. कर्जत, नेरळ आणि लगतच्या परीसरातील पाणी प्रश्न सुटावा, शेती सिंचनाखाली यावी यासाठी हा या धरणाच्या उभारणी मागचा मुळ उद्देश होता. पुर्वी जलसंपदा विभागा मार्फत या धरणाची निर्मिती केली जाणार होती. मात्र धरणाच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, आणि धरणाचे काम थांबले होते. यानंतर हे धरण आता सिडकोच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरवातीला लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ८० कोटी ३५ लाख रुपयांच्या धरणाची उभारणी करण्यात येणार होती. नंतर मात्र धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे धरणाचा खर्च ८० कोटीवरून ४३५ कोटींच्या घरात गेला होता. आता धरणाच्या कामाचा खर्च दिड हजार कोटींच्या आसपास  पोहोचला आहे. स्थानिकांचा विरोध, पुनर्वसनातील अडचणी यामुळे धरणाचे काम मार्गी लागण्याची चिन्ह अजूनही दिसत नाहीत.

काळ कुंभे प्रकल्प

महाड आणि माणगाव तालुक्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी सावित्री नदीच्या उपनद्यांवर काळ आणि कुंभे अशी दोन धरणे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोकण पाटबंधारे विकास प्रकल्पा अंतर्गत या धरणांची उभारणी केली जाणार होती. या धरणांवर जलविद्युत प्रकल्प होणार होती. मात्र २५ वर्षांनंतरही काळ जलविद्यूत प्रकल्पाचे काम मार्गी लागू शकलेले नाही. विस्तापित कुटूंबांचे पुनर्वसनही झालेले नाही. न झालेल्या धरणाची किमंतर दीड हजार कोंटीवर पोहोचली आहे. रायगड किल्ल्याच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून या धरणाची उभारणी केली जाणार होती.

१४ जुलै १९९८ साली धरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ९८ कोटी ९९ लाख इतकी होती. धरणाच्या कामाला २००४ साली प्रत्यक्ष सुरवात झाली. चार वर्ष काम जोमाने सुरू होते. मात्र नंतर हे काम बंद पडले ते आजतागायत बंद आहे.धरणाच्या कामाला २००४, २००९, २०११ आणि २०२४ अशा चार वेळा सुधारीत मान्यता दिली गेली. धरणाच्या कामाची किमंत ९८ कोटींवरून दीड हजार कोटींवर पोहोचली आहे. मात्र अजूनही धरणाचे काम मार्गी लागू शकलेले नाही.

रायगड आणि नवीमुंबईतील पाणी प्रश्नासाठी हे प्रकल्प महत्वाचे आहेत. त्यामुळे  दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांना गती देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

आधी पुनर्वसन आणि मग धरण हे सरकारचे धोरण आहे. पण सरकार प्रकल्पांसाठी आग्रही असले तरी प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाकडे लक्ष द्यायला तयार नाही. जुने निवाडे असल्याचे सांगून प्रकल्पग्रस्तांची अडवणूक केली जात आहे. त्यांच्या संपादीत जागांना योग्य मोबदला द्यायला तयार नाही. बहुतांश प्रकल्पातील ही मोठी अडचण आहे.- सदाशिव नारायण आंग्रे, सांबरकुंड धरण प्रकल्पग्रस्त

सांबरकुंड धरणाचा भूसंपादनाशी निगडीत प्रश्न आता बाकी आहे. तो सुटला की धरणाचे काम मार्गी लागू शकेल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. इतर सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत.- दिनेश्री राजभोज, कार्यकारी अभियंता, हेटवणे प्रकल्प विभाग…