बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडत लालूप्रसाद यांच्या पक्षासोबत सत्तास्थापन केली. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठित खंजीर खूपसला त्याचप्रमाणे नितीशकुमार यांनी भाजपाच्या पाठित खंजीर खूपसला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – “पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले खरे, पण २०२४मध्ये…”, शपथविधीनंतर नितीश कुमार यांचा खोचक टोला!

नितीश कुमार हे उद्धव ठाकरेंप्रमाणे मोदींच्या नावावर मत मागून सत्तेत आले होते. कमी जागा असतानाही भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले. कारण अमित शहा यांनी नितीश कुमार यांना शब्द दिला होता. मात्र, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठित खंजीर खूपसला त्याचप्रमाणे नितीशकुमार यांनी भाजपाच्या पाठित खंजीर खूपसला. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत, भाजपासोबत सत्ता स्थापन केली, असाच प्रकार पुढे बिहारमध्येही बघायला मिळेल, बिहारची जनताच नितीशकुमार यांना धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

हेही वाचा – विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये नाराजी, अशोक चव्हाण म्हणाले, “न विचारताच…”

दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राजदचे तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाशी काडीमोड घेऊन राजदशी संसार थाटत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राजकारणात काहीही अशक्य नसल्याचंच दाखवून दिलं आहे. २०१७मध्ये “काहीही झालं तरी राजदसोबत जाणार नाही” म्हणणारे नितीश कुमार आज त्यांच्याच पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले.“निवडणूक काळात त्यांचं (भाजपा) वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सगळ्यांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया त्यांनी शपथविधीनंतर दिली.