काही दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यावरून मुंबईत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांची जामिनावर सुटका झाली असून ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये राणा दाम्पत्य मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आता जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्य सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलं नाही का?”

मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आम्हाला नागपूर विमानतळावर अडवण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. “३६ दिवसांनंतर जेव्हा आम्ही नागपूरमध्ये येतोय, मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी ठेवली आहे. आम्हाला आतमध्ये थांबवून ठेवण्यात आलं होतं. देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का आहे? उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. “महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं यासाठी सगळ्यांनी आराधना करायला हवी. महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हायला हवा”, असं देखील नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान, हनुमान चालीसा पठण हा सगळा दिखावा करत असल्याची टीका होत असल्याबाबत विचारणा केली असता नवनीत राणा यांनी त्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आम्ही दिखाव्यासाठी करतो, मुख्यमंत्री दिखाव्यासाठीही करत नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी का होईना, हनुमान चालीसा वाचावी” असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

“हा सगळा मुख्यमंत्र्यांचा अहंकारच”

यासंदर्भात बोलताना रवी राणा यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “ही सगळी नेहमीची प्रक्रिया आहे. आम्ही जिथे जिथे पोहोचतो, तिथे मुख्यमंत्री पूर्ण ताकद लावतात. आम्हाला परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हा सगळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार आहे. राज्याची जनता हे पाहात आहे. हनुमानाचं नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला हा अहंकार मोडून काढण्याचं काम राज्यातील हनुमान भक्त करतील”, असं रवी राणा म्हणाले.