घटोत्थापनाने तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता

(तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे व पुजारी मंडळांनी होमाचा धार्मिक विधी पार पडल्यानंतर घटोत्थापन केले)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता गुरूवारी महानवमीला मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पुजार्‍यांच्या हस्ते घटोत्थापनाने झाली. ‘आई राजा उदो-उदो, सदानंदिचा उदो-उदो’च्या जयघोषात होमावरील धार्मिक विधी व विजयादशमीचा उत्सव पार पडला. रात्री नगरहून आलेल्या पलंग पालखमीची मिरवणूक मोठ्या दिमाखात पार पडली. दरम्यान दिवसभरात राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

शारदीय नवरात्रात नवमीच्या होमावरील धार्मिक विधीला अनन्य साधारण महत्व आहे. सकाळी सिंदफळच्या लांडगे परिवाराचे मानाचे बोकड हळदीची उधळण करीत सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आले. तत्पूर्वी सकाळी दही-दूधाचे अभिषेक व देवीची नित्योपचार पूजा, आरती करण्यात आली. होमकुंडावर उपस्थित हजारो भाविकांनी आई राजा उदो-उदोचा गगणभेदी निनाद व स्थानिक गोंधळ्यांनी संबळाचा कडकडाट केला. अत्यंत रोमहर्षक वातावरणात तुळजाभवानी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर कदम, पुजारी गब्बर सोंजी, सचिन कदम, संजय कदम, उदय कदम, निलेश कदम, अतुल मलबा, राजाभाऊ मलबा, सचिन पाटील, शशिकात पाटील, रूपेश परमेश्वर यांच्यासह शेकडो पुजारी होमावर चढले. मानाचे बोकड होमावर आणल्यानंतर होमावरील हा विधी संपन्न झाला. त्यानंतर टीळा लावण्यास भवानी मातेच्या गाभार्‍यात विधी पार पडला. त्यानंतर सिंह गाभार्‍यातील घटोत्थापनाचा सोहळा पार पडला.

शुक्रवारी तुळजाभवानी मंदिरात सिमोल्लंघनाचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून रात्री देवीजींच्या छबीना मिरवणुकीनंतर मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. चार दिवसांच्या निद्रेनंतर मंगळवार, 23 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला रात्री भवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दुसर्‍या दिवशी मंदिरात पौर्णिमा उत्सव व रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह देवीजींची छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navratri fest tulja bhavani devi tuljapur

ताज्या बातम्या