Indian Navy personnel dies in Lonavala: डोंगरदऱ्यात फिरायला गेल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर जीवावर बेतू शकते. आजवर अनेक प्रसंगातून हे दिसून आले आहे. लोणावळ्यात पुन्हा याची प्रचिती देणारी घटना घडली. आपल्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉलद्वारे लोणावळ्यातील कड्यावरील ठिकाण दाखवत असताना भारतीय नौदलातील एक जवान ४०० फूट खोल दरीत पडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राकेश कुमार मिश्रा (वय ४९) असे आहे. ते आयएनएस शिवाजी येथे मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्हणून तैनात होते. दिल्लीतील मंगोलपुरीचे रहिवासी असलेले राकेश मिश्रा हे टायगर पॉईंटवर त्यांचे सहकारी महेंद्र सिंह यांच्याबरोबर आले होते. तेव्हा हा अपघात घडला.

महेंद्र सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली.

Lonavala Tiger Point Accident site overview
४९ वर्षीय राकेश कुमार मिश्रा यांचा व्हिडीओ कॉलवर बोलत असताना दरीत कोसळून मृत्यू

पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, मिश्रा यांचा मुलगा ३० मे रोजी आपल्या मित्रांबरोबर टायगर पॉईंटला भेट देण्याची योजना आखत होता. त्यामुळे सहलीचे नियोजन करण्यासाठी मिश्रा महेंद्र सिंह यांच्याबरोबर तिथे गेले होते.

व्ह्यू पॉईंटवर पोहोचल्यानंतर महेंद्र सिंह एका झाडाखाली बसले होते. त्यावेळी मिश्रा यांनी आपल्या मोबाइल फोनवरून त्यांच्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल लावला. नातेवाईकाला कडा दाखवत असताना एका झाडाभोवती त्यांचा तोल गेला आणि ते दरीत पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

want to visit bhushi dam lions tiger point in lonavala
पावसाळ्यात लोणावळा, टायगर पॉईंट येथे अनेक पर्यटक गर्दी करतात.

मिश्रा यांनी महेंद्र सिंह यांना मदतीसाठी हाक मारली. पण सिंह दरीत खोल उतरू शकले नाहीत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि स्थानिक शिवदुर्ग बचाव पथकाचे सदस्य टायगर पॉईंटवर पोहोचले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत मिश्रा यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.

टायगर पॉईंटजवळ अनेकांचा मृत्यू

लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे यापूर्वीही काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात लोणावळ्यात गिर्यारोहणासाठी आलेल्या नवी मुंबईतील तरुणीचा मृतदेह टायगर पॉईंट परिसरातील दरीत सापडला होता. लोणावळा परिसरातील नागफणी (ड्युक्स नोज) परिसरात २० वर्षीय श्रृती गिर्यारोहणासाठी गेली होती. मात्र तिचा अकस्मात मृत्यू झाला.