महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण ७ ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुनच आता मलिक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज ते म्हणाले, “कालपासून माध्यमांद्वारे अफवा पसरवण्याचं काम सरकारी तपास यंत्रणांनी सुरु केलं आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापे पडले आहेत, नवाब मलिक अडचणीत आले आहेत. पण मी ईडीच्या लोकांना हे सांगू इच्छितो, तुम्ही अफवा पसरवण्याचं काम बंद करा. पत्रकार परिषदा घेऊन किंवा प्रेसनोटद्वारे खऱ्या बातम्या द्या. बातम्या लीक करुन नुसता दंगा निर्माण करुन नका. मालकांना खूश करण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे, मला माहित आहे”.

हेही वाचा – “ईडी माझ्या घरापर्यंत आली तर…”; वक्फ बोर्ड कार्यालयावर पडलेल्या छाप्यांवर नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

ते पुढे म्हणाले, “ज्या अधिकाऱ्याला असं वाटतंय की त्यांच्या मालकांनी सांगितलं की नवाब मलिक घाबरेल. मी त्यांना सांगतो की नवाब मलिक कोणाला घाबरत नाही, घाबरणार नाही. चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा. मी स्पष्ट सांगतो, या प्रकारामुळे नवाब मलिक घाबरणार नाही. चोरांविरोधात ही लढाई सुरू केली आहे, ती शेवटपर्यंत चालेल”.