अनिल देशमुखांविरोधात कटकारस्थान झाल्याचा नवाब मलिकांचा आरोप; सांगितलं यामागचं कारण

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

परमबीरसिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीरसिंग यांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे चार्जशीटमध्ये परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी दिले होते असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. एक्स्टॉरशनच्यासाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nawab malik accuses in the case on anil deshmukh nia didnt conducted parambir singhs enquiry vsk