scorecardresearch

“..असं महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नव्हतं”; प्रवीण दरेकरांनी केली नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

देवेंद्र फडणवीस राज्यातल्या ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“..असं महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नव्हतं”; प्रवीण दरेकरांनी केली नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिकांनी सुरू केलेलं समीर वानखेडेंवरच्या आरोपांचं सत्र आता वेगळंच वळण घेताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात भाजपाचाही सहभाग आहे, असा नवा आरोप आज नवाब मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्यातल्या ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

याबद्दल माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “मला वाटतं नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कारण रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा, त्या आधारे ट्विट करायचं आणि सनसनाटी पैदा करण्याचा प्रयत्न करायचा अशी त्यांची गेल्या काही दिवसातली कामगिरी दिसतेय. मला असं वाटतं, मंत्री म्हणून शपथ घेताना गुप्ततेच्या ज्या अटी संविधानाने घातलेल्या आहेत, त्याचाही भंग होताना दिसतोय. वैयक्तिक किंवा जातीवरुन एखाद्याला बोलणं मला वाटतं हा गुप्ततेचा भंग आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. समीर वानखेडे हा मुस्लीमच आहे असा अट्टाहास कशासाठी? कोण कुठल्या जातीत जन्माला येतो याचा अट्टाहास का? त्यामुळे शपथेचा भंग केल्याप्रकरणी त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे”.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उलाढालींचे मास्टर माइंड; नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या परिवारावर केलेल्या आरोपांवर दरेकर म्हणाले, “मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यामुळे वैफल्यातून ते रोज आरोप करत आहेत आणि आता तर दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या परिवारापर्यंत जाऊन त्यांच्यावर आरोप करण्याच्या किळसवाण्या हरकती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात असा बेताल वक्तव्य करणारा मंत्री पाहिलेला नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या