महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागितली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलांनी याबाबत तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

राज्यसभा निवडणूकीच्या वेळी मतदानाची परवानगी नाही

या अगोदरही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राजसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी मागितली होती. मात्र, त्यावेळेसही त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत तरी मतदान करता यावे यासाठी देशमुख-मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासाठी बंधपत्रावर एक दिवसाचा जामीन मंजूर करण्याची मागणी देशमुख-मलिक यांनी याचिकेद्वारे केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायलयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

१० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. या १० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानानंतर संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीसोबत भाजपाचे आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपाने आपले ५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवसेना नेते संजय पवार यांचा भाजपा नेते धनंजय महाडिक यांनी पराभव केला होता. पुरेसे संख्याबळ असतानाही पवार यांचा पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला होता. आता विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.