राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. आपल्या घराच्या आसपास काही अज्ञात इसम फिरत असून घरावर पाळत ठेवली जात असल्याचं या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले होते. मात्र, गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचेच असताना सोशल मीडियावर ही बाब का समोर आणत आहात, तक्रार करा, असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावल्यानंतर त्यावर नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं.

नवाब मलिक यांचं ‘ते’ ट्वीट

नवाब मलिक यांनी शुक्रवारी संध्याकाळी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये एका कारमधील काही लोक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराच्या आणि शाळेच्या आसपास फिरून रेकी करत असल्याचा दावा केला आहे. तसेच, या फोटोतील लोकांना आपली काही माहिती हवी असल्यास थेट मला भेटा, मी त्यांना माहिती देईन, असं देखील नवाब मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अतुल भातखळकरांचा प्रतिप्रश्न

दरम्यान, नवाब मलिक यांच्या या ट्वीटवर अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रतिप्रश्न केला आहे. “नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्वीट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही?” असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

“मोदी साहेबांनीच आम्हाला हे शिकवलं!”

दरम्यान, या ट्वीटविषयी विचारणा केली असता नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “सोशल मीडियाचा वापर मोदी साहेबांनीच आम्हाला शिकवलाय. या बाबतीत आम्ही त्यांचे शिष्य आहोत. सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुकचा वापर कसा करायचा, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत. विरोधक या बाबतीत इतके तयार झाले आहेत की त्यांना या बाबतीत सोशल मीडियावर चारीमुंड्या चीत केलं जातं. त्याची भिती भाजपाला वाटते. कायदेशीर कारवाई होणारच आहे. पण तुमचं चीलहरण जनतेसमोर होणं गरजेचं आहे. ते आम्ही करतच राहू”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

मी अमित शाहांना तक्रार करणार, केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप चॅटही देणार : नवाब मलिक

“तुम्हीच हा आखाडा तयार केलाय”

“सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचं काम भाजपानं सुरू केलं होतं. २०१४मध्ये असत्य पसरवून ते सरकारमध्ये आले आणि ७ वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना भरकटवण्याचं काम त्यांनी केलं. पण ७ वर्षांत विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्याच आखाड्याचे पैलवान झाले आहेत. ते इतके तयार झाले आहेत की भाजपाचं असत्य लगेच ते लोकांसमोर आणतात. तुम्हीच नवीन आखाडा तयार केला होता. आता आखाड्यातले पैलवान तुमच्यापेक्षा वरचढ झाले तर तुम्ही म्हणतात आखाड्यात का खेळता?” असा सवाल देखील त्यांनी भाजपाला विचारला आहे.